र. ए. सोसायटीच्या रत्नागिरी शिक्षण संस्थेचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि गद्रे इन्फोटेक प्रा. लि. यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) नुकताच संपन्न झाला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत महाविद्यालय असून, नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाने सलग चार मुल्यांकनांमध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण, संशोधन अशा विविध क्षेत्रात महाविद्यालयाने सातत्याने उल्लेखनीय सुयश प्राप्त केलेले आहे. महाविद्यालयाने महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध आस्थापनांबरोबर सामंजस्य करार केले असून या माध्यमातून विद्यार्थी आणि समाजाभिमुख विविध शैक्षणिक-सहशैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाच्या पुढाकाराने गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि गद्रे इन्फोटेक प्रा. लि. यांच्यामध्ये दोन वर्षांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
या सामंजस्य करारांतर्गत फॅकल्टी- स्टुडंट एक्सचेंज, स्टुडिटन्स इंटर्नशिप अशा विविध उपक्रमांचे आयोजन दोन्ही आस्थापनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि गद्रे इन्फोटेक प्रा. लि.चे सीइओ श्री. वैभव गोगटे यांनी आपापल्या आस्थापनांची माहिती उपस्थितांना देऊन भविष्यात शिक्षक आणि विद्यार्थीभिमुख कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.
सदर सामंजस्य कराराप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, गद्रे इन्फोटेक प्रा. लि.चे सीइओ श्री. वैभव गोगटे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे आय.क्यू.ए.सी. सहसमन्वयक डॉ. विवेक भिडे, सामंजस्यकरार समितीच्या समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे, प्रा. अमोल सहस्रबुद्धे, प्रा. सनील सावले, गद्रे इन्फोटेकचे श्री. अमोल बापट उपस्थित होते.