गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बायोलॉजीकल सायन्स विभागातर्फे दि. ८ डिसेंबर २०१७ रोजी एड्स जनजागृती दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. किशोर सुखटणकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे उपस्थित होते.
याप्रसंगी भित्तीचित्र स्पर्धा तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४५ गटांनी सहभाग घेतला. यामधून प्रतीक्षा फुटक- गिरीषा महाले यांच्या गटाने प्रथम, अमृता गडदे-आरती यादव यांच्या गटाने द्वितीय, श्रुती किनरे हिने तृतीय, योगिता कडवईकर-शिवानी पालकर आणि इरम हाजू-समीक्षा शिवलकर यांच्या गटाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या स्पर्धेसाठी श्री. महेश नाईक आणि श्री. डी. आर. वालावलकर परीक्षक म्हणून लाभले होते.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत बारा गट सहभागी झाले. त्यामधून नेहा घाणेकर, समान दाते व अश्विन सावंत या गटाने प्रथम; गीतांजली खरे, मयुरी घोलम, शैलेश आग्रहारी या गटाने द्वितीय तर सोहम कुशे, प्रितम हुल्ले, अस्मिता शेट्ये या गटाने तृतीय क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचा प्रेक्षक विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
दुपारच्या सत्रात कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. रश्मी आठल्ये यांनी ‘एड्स आणि एड्स बाधितांचे आरोग्य अधिकार’ या विषयावर अतिशय प्रबोधनपर व्याख्यान दिले. त्यांनी अवयवदानाबद्दल जनजागृती केली. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी आवाहन केले. जिल्हा शासकिय रुग्णालयाचे श्री. जाधव यांच्याकडून विद्यार्थ्यांनी अवयवदानासंबंधीचे फोर्म घेऊन डॉ. आठल्ये यांच्या आवाहनाला साकारात्मक प्रतिसाद दिला.
यानंतर विजेत्या स्पर्धकांचे बक्षिस वितरणही पार पडले. या दिनानिमित्त जनजागृती साधून प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीही डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बायोलॉजीकल सायन्स विभागाने आपली परंपरा केली.