मुंबई विद्यापीठाला १६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यापीठाने सलग्न अशा १६० महाविद्यालयांतून विविध विषयावर १६० व्याख्यानांचे आयोजन केले आहे. या उपक्रमाकरिता येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची निवड होऊन दि. ०५ जानेवारी २०१६ रोजी महाविद्यालयामध्ये होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मानखुर्द, मुंबई येथील डॉ. अनिकेत सुळे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमाचा प्रारंभ विद्यापीठ गीताने करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी मुंबई विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास सांगून उपस्थितांना विद्यापीठाची प्रतिज्ञा दिली. भारतात आढळणाऱ्या शीला चित्रांवरून, मोठमोठ्या वास्तू रचनांवरून, प्राचीन ग्रंथाच्या आधारे प्राचीन काळी अवघत असणारे खगोल ज्ञान जाणून घेण्याच्या विविध पद्धतींची माहिती प्रमुख वक्ते डॉ. अनिकेत सुळे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांसमोर मांडली. तसेच खगोलशास्त्र व खागोलभौतिकशास्त्र अभ्यास आणि संशोधनाच्या विविध संधी याबाबतची माहिती त्यांनी दिली.
महाविद्यालच्या वतीने डॉ. अनिकेत सुळे यांचा सत्कार प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. विवेक भिडे यांनी डॉ. सुळे यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ. महेश बेळेकर, प्राध्यापक, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.