गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यास आणि अभ्यासेतर अशा सर्व उपक्रमांमधून गुणवत्ता संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा गौरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्यात व्यासपीठावर वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे, कला विभागाच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा सकपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या विद्यार्थी आणि शिक्षक गुणगौरव सोहळ्यामध्ये आदर्श शिक्षक आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विभागाचे विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या एम.सी.व्ही.सी. विभागाचे पर्यवेक्षक प्रा. माधव पालकर यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार’ लिपिक श्री. ओंकार पोंक्षे आणि सेवक श्री. रवींद्र गोरे यांना विभागून देण्यात आला. तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ महविद्यालयातील अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमांतून आपल्या प्रतिभेचा अविष्कार करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा प्राचार्याच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरणानंतर आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचा आढावा घेतला आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.