gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात बावडेकर व्याख्यानमाला संपन्न ‘हरित तंत्रज्ञान- माझे आकलन’ या विषयावर डॉ. व्ही. व्ही. महाजनी यांनी व्याख्यानमालेचे ३७ वे पुष्प गुंफले

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी कै. बावडेकर व्याख्यानमालेचे ३७वे पुष्प डॉ. व्ही. व्ही. महाजनी, निवृत्त प्राध्यापक, आय.सी.टी. मुंबई; सल्लागार, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, महाराष्ट्र शासन यांनी गुंफले. ‘हरित तंत्रज्ञान- माझे आकलन’ हा विषय त्यांनी निवडला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. ऋजूता गोडबोले यांनी बावडेकर सरांचा परिचय करून दिला. ‘स्मृतीगंध’ या त्यांच्या जीवनावरील चरित्रग्रंथातील काही स्मृतींना उजाळा दिला. एक आदर्श शिक्षक, प्राचार्य आणि दानशूर व्यक्ती असे वर्णन करून त्यांचे व्यक्तिविशेष स्पष्ट केले.

र. ए. सोसायटीचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा याप्रसंगी सत्कार केला. कार्यक्रमाचे औचित्य साधून रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी श्री. चैतन्य घनवटकर यांचा ‘विद्यावाचस्पती पदवी’ संपादन केल्याबद्दल डॉ. महाजनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. मेघना म्हादये यांनी करून दिला.

‘हरित तंत्रज्ञान- माझे आकलन’ याविषयावर भाष्य करताना डॉ. महाजनी यांनी विविध क्षेत्रातील संशोधनामध्ये असलेल्या आपल्या योगदानाबद्दल माहिती दिली. अनेक रासायनिक क्रियांमध्ये हरित तंत्रज्ञान कसे वापरता येईल; याबद्दल आपले विचार व्यक्त केले. हरित तंत्रज्ञानाची १२ सूत्रे अत्यंत सोप्या शब्दांत विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. हरित तंत्रज्ञान हे पर्यावरणपूरक असल्याने आजच्या काळातील या तंत्रज्ञानाची असलेली गरज विस्तृतपणे विषद केली.

अध्यक्षीय समारोप करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कै. बावडेकर सरांच्या स्मृतींना उजाळा देत डॉ. महाजनी यांचे आभार व्यक्त केले. तसेच हरित तंत्रज्ञानाचे महत्व विषद केले.

विज्ञान मंडळातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक, माजी प्राध्यापक आणि शहरातील नागरिक उपस्थित होते. या सर्वांचे आभारप्रदर्शन डॉ. विवेक भिडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजश्री भावे यांनी केले.

 

Comments are closed.