गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारे ‘आदर्श वाचक- ‘ग्रंथरत्न’ पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. दि. २६ जानेवारी रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण वाचनाची अभिरुची, ग्रंथालयात वर्षभर चालणाऱ्या वाचनविषयक विविध उपक्रमांतील सहभाग, ग्रंथालयाच्या विविध विभागांमध्ये सातत्याने दिलेल्या भेटी, वर्षभर वाचलेली अभ्यासेतर पुस्तके, वाचक गटातील उल्लेखनिय कामगिरी आणि स्पर्धांतील सहभाग; असे निकष ‘आदर्श वाचक’ म्हणून निवड करताना विचारात घेतले जातात.
विद्यमान वर्षीचा ‘आदर्श शिक्षक वाचक-ग्रंथरत्न सन्मान’ वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. सीमा राजेश वीर (मराठी विभाग) यांनी तर ‘आदर्श विद्यार्थी वाचक-ग्रंथरत्न सन्मान’वरिष्ठ महाविद्यालयाकरिता कु. शुभराणी शिवदास होरंबे (प्रथम वर्ष कला) हिने आणि कनिष्ठ महाविद्यालायाकरिता विश्वजीत जितेंद्र सागवेकर (बारावी कला) याने पटकवला. या पुरस्कारांचे स्वरूप एक ग्रंथ, प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ असे होते.
पुरस्कार विजेत्यांचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे आणि महाविद्यालयीन प्राध्यापक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.