gogate-college-autonomous-updated-logo

“स्त्री सक्षमीकरणाची बीजे पुरुषांच्या मनात रुजवणे आवश्यक” – न्या. नेत्रा कंक ; गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘महिला सक्षमीकरण’ या विषयावर विचारमंथन

स्त्रीला आदर, कौतुक आणि प्रेम या तीन गोष्टींची नितांत गरज आहे. स्त्री सक्षमीकरणाची बीजे पुरुषांच्या मनात रुजवली गेली पाहिजेत, असे मत कौटुंबिक न्यायालय, ठाणे येथील न्यायाधीश नेत्रा अजय कंक यांनी येथे व्यक्त केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिषदेत बीजभाषक म्हणून त्या बोलत होत्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व महिला विकास कक्ष आणि श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाश्वत भविष्यासाठी महिला सक्षमीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन न्या. नेत्रा कंक यांच्या हस्ते झाले. ‘बदलत्या सामाजिक परिस्थितीतील स्त्रियांचे अधिकार’ विषयावर त्यांनी आपल्या बीजभाषणपर मनोगतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम यांनी केले. त्यात त्यांनी परिषदेची रूपरेषा, परिषदेत विविध विषयांवर होणारे विचारमंथन आणि संशोधकांद्वारे सादर केले जाणारे शोधनिबंध इ.ची माहिती विशद केली.

परिषदेला शुभेच्छा देतानार. ए. सोसायटीच्या नियामक मंडळ सदस्या आणि रत्नागिरीतील सुप्रतिष्ठीत वकील ॲड. प्राची जोशी म्हणाल्या, स्त्री प्रश्न, स्त्री स्वातंत्र्य, स्त्री शिक्षण यावर आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. समाजातील पुरुषी मानसिकता बदलून स्त्रियांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव करून दिली पाहिजे. असे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होईल, आपणसर्वांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही त्या पुढे म्हणाल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडून स्त्री-पुरुष समानतेला महत्त्व दिले पाहिजे. दोघांनीही समान पातळीवर काम करणे गरजेचे आहे, असे सांगून परिषदेला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी व्यासपीठावर एस. व्ही. इनामदार (दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर), ॲड. प्राची जोशी, डॉ. कल्पना मेहता, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे, प्रा. संयोगिता सासणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

या परिषदेत डॉ. कल्पना मेहता यांनी ‘महिला सक्षमीकरणात स्त्री आरोग्याचे महत्व’, ॲड. संध्या सुखटणकर यांनी‘महिलांच्या कायदेशीर अधिकारांद्वारे लिंग संवेदना’ तर डॉ. स्वाती गाडगीळ यांनी‘लिंग संवेदना’ या विषयांवर साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले.

या परिषदेदरम्यान देशभरातून संशोधकांनी विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्त्रीशिक्षण, महिलांचे आरोग्य, लिंगविषयक संवेदना, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महिलांचे योगदान, महिला सक्षमीकरणाबाबत भारतीय आणि जागतिक दृष्टीकोन, महिलांसाठीचे कायदेशीर हक्क आणि सामाजिक न्याय, महिला आणि प्रसारमध्यमे, महिलांसाठी भविष्यातील कल आणि शाश्वत संधी अशा विविध विषयांवर शोधनिबंधाचे सादरीकरण केले. या चर्चासत्रांचे अध्यक्षपद डॉ. यास्मिन आवटे. डॉ. चित्रा गोस्वामी. डॉ. कल्पना आठल्ये आणि डॉ. मधुरा मुकादम या शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींनी भूषविले. परिषदेदरम्यान विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित पोस्टरचे सादरीकरण केले. त्याचे परीक्षण डॉ. सीमा कदम आणि डॉ. मेघना म्हादये यांनी केले.

परिषदेच्या समारोपप्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि दिशांत संस्थेच्याश्रीमती सीमा यादव यांनी‘ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. स्त्रियांच्या सक्षमीकरण करण्यासाठी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा एक सेतू बांधावा लागेल, तरच महिलांच्या समस्या सुटण्यास मदत होईल. स्त्रियांनी देखील स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील एक रेखा आपणपार केली आहे का, याचा अंतर्मुख होऊन विचारकरावा. शाश्वत भविष्यासाठी महिला सक्षमीकरणाचा विचार करताना स्त्री स्वातंत्र्याचा विचारहोणे आवश्यक आहे, असे त्या पुढे म्हणाल्या. याप्रसंगी डॉ. वसुंधरा जाधव आणि डॉ. पूजा माने यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.

परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतातून परिषदेच्या विविध पैलूंना स्पर्श केला.

या राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि प्राचार्य ॲड. डॉ. आशिष बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम, विधी महाविद्यालयाच्या प्रा. संयोगिता सासणे आणि अन्य आयोजक सदस्य, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

ही परिषद ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरुपात पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा सुर्वे यांनी तर डॉ. सोनाली कदम यांनी आभारप्रदर्शन केले.

Comments are closed.