गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून पदवी व पदव्युत्तर विभागातील तीनही विद्याशाखांतील विद्यार्थी-विद्यार्थिनीकरिता दि. १ सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेत २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत उत्तम प्रतिसाद दिला. पुणे येथील बँकिंग तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रदर्घ अनुभव असलेल्या श्री. राघवन अय्यंगार यांनी विद्यार्थ्यांशी तीन विविध सत्रांमध्ये संवाद साधला. कॉमर्स विद्याशाखेतील शिक्षणांनंतरच्या संधी व करिअर, शेअर बाजाराविषयी मुलभूत गोष्टी तसेच व्यक्तिमत्व विकास आणि मुलाखत प्रक्रिया अशा विविध विषयांच्या माध्यमातून संवाद साधला. उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी वरील सर्व विषय खूप चांगल्याप्रकारे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविले.
सकाळच्या उद्घाटन सत्रात समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाचा उद्देश आणि स्वरूप विषद केले. वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे यांनी पाहुण्यांचे स्वागत तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
समारोपप्रगंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी अशा कार्यक्रमांचे विद्यार्थ्यांच्या करिअरमधील महत्व विषद करताना प्रत्येकाने आपल्यातील गुणांना ओळखून करिअरच्या योग्य वाट कशा निवडता येतात; याविषयी मार्गदर्शन करीत उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. स्वामिनाथन भट्टर, डॉ. दिनेश माश्रणकर, डॉ. स्वरूप घैसास,प्रा. स्वप्नील जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.