गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दि. १५ ऑक्टोबर हा भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वाचन चळवळीस पूरक असे उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता ‘अग्निपंख’ या डॉ. कलाम यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले. भारतरत्न डॉ. कलाम यांची जडण-घडण, त्याच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे, त्यांचे ध्येय, आत्मविश्वास असा सारा प्रवास या अभिवाचनातून प्रकट झाला. राष्ट्रपती, एक महान शास्त्रज्ञ आणि मुलांमध्ये रमणारी एक विनम्र व्यक्ती हे डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू अभिवाचक विद्यार्थ्यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून उभे केले. हे अभिवाचन वाचक गटाचे विद्यार्थी विजय सुतार, कु. नेत्रा केळकर, कु. सौम्या पई, कु. शलाका वारेकर, शुभम सरदेसाई, कु. सुरभी वायंगणकर, कु. सुनेत्रा पोकडे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य विवेक भिडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुशील वाघधरे, पर्यवेक्षिका प्रा. विशाखा सकपाळ, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.
तत्पूर्वी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रंथालय ‘वाचन प्रेरणा दिवस’ साजरा करत असताना महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांना वर्षभर विविध सेवा देण्यात येतात त्यांचाही आढावा घेतला. या दिवसाच्या निमित्ताने भेट द्यावयाची झाल्यास ‘बुके ऐवजी बुक’ भेट द्या असे उपस्थितांना आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ‘आजच्या दिवशी तुम्ही एक निश्चय करा आणि पुस्तकांशी कायमची मैत्री प्रस्थापित करा असे आवाहन करताना ई-बुक्सच्या जमान्यातही छापील पुस्तकाचे महत्व विसरू नये याची आठवण करून दिली.’ ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना आदर्श मानून वाटचाल केल्यास जीवनात सुयश मिळेल. डॉ. अब्दुल कलाम यांचे उच्च ध्येयाने प्रेरित आयुष्य आणि उत्तुंग कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे कायमच मार्गदर्शन करेल. तुम्ही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर असलात तरी पुस्तकासारखा सच्चा मित्र मिळणे शक्य नाही. अभ्यास आणि अवांतर वाचन तुम्हाला समाजातील एक उत्तम व्यक्ती घडवेल; असे सांगून ग्रंथालयाच्या विद्यार्थीभिमुख अशा विविध उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यानंतर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या हस्ते ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत ‘कला आणि विज्ञान विषयाला’ वाहिलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन संपन्न झाले. जागतिक अंध दिनानिमित्त ब्रेल लिपीतील पुस्तके या प्रदर्शनाचे आकर्षण होते तसेच अनेक ई-बुक्स, ऑडिओ बुक्स आणि डी.व्ही.डी. यांनीही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘वाचन प्रेरणा दिवसाचे’ औचित्य साधून ग्रंथालयात ‘चला वाचूया अभियान’ हाती घेण्यात आले. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होताना ग्रंथालयातील ‘आपल्या आवडीचे पुस्तक’ वाचले. कला, विज्ञान आणि वाणिज्य विभागातील विद्यार्थी या अभियानात आपले आवडते पुस्तक हाती घेऊन सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांशीही प्राचार्यांनी संवाद साधला आणि या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला इतिहास विभाग प्रमुख डॉ. रमेश कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. शिवराज गोपाळे, डॉ. निधी पटवर्धन, प्रा. सायली पिलणकर, प्रा. जयंत अभ्यंकर, प्राध्यापक, वाचक गट, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विजय सुतार याने केले. या उपक्रमात ग्रंथालय कर्मचारीही सहभागी झाले होते.