गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये झेप या युवा महोत्सवाचे औचित्य साधून विविधरंगी कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवांतर्गत कार्यक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी कला, वाणिज्य आणि विज्ञान या शाखांना विभागून देण्यात आली आहे.
खातू नाट्य मंदिर येथे व्ही.पी.सी. या कार्यक्रमात सर्व विद्याशाखांतील अनेक विद्यार्थी स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला अतिथी व परीक्षक म्हणून श्रीम. अंतरा खवळे, श्री. अमित कदम, श्री. स्वप्नील आणि नेहा साळवी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत सुशांत केतकर, कु. भक्ती ओसवाल प्रथम, सनम दाते व सिरीन काझी द्वितीय तर नॉयल विल्सन, स्वामिनी चव्हाण व आसावरी आखाडे यांची तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली. स्पर्धेचा परीतोषिक वितरण सोहळा उपस्थित प्रमुख अतिथी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, आणि तीनही विभागांचे उपप्राचार्य यांच्या हस्ते झाला.
असाच दुसरा रंगतदार ‘नृत्यरंग’ हा कार्यक्रम रंगला. या एकेरी, दुहेरी आणि समूह नृत्य अशा विविध रंगात रंगलेली ही स्पर्धा उपस्थित तरुणीचे आकर्षण ठरली. एकेरी नृत्य स्पर्धेत ऋत्विक सनगरे प्रथम, गौरी साबळे द्वितीय तर शुभम नंदाणे याने तृतीय क्रमांक पटकावला. दुहेरी नृत्य स्पर्धेत ऋतुजा पालकर आणि श्रद्धा पवार प्रथम, मानसी कळंबटे व प्रतीक्षा जाधव द्वितीय तर समूह नृत्यात आर.डी.एस. ग्रुप आणि डायमंड ग्रुप यांनी बाजी मारली. या स्पर्धेला सौख्यदा वैशंपायन आणि सपना साप्ते परिक्षक म्हणून लाभले.
झेप या युवा महोत्सवांतर्गत ‘भाटवडेकर चषक’ ही स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेत कलाविष्कार संघ यांचे ‘महान अमुचा देश’ या स्कीटला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक लाभले. स्पर्धेला परिक्षक म्हणून मयूर साळवी आणि सुबोध आमकर यांनी काम पहिले.
याखेरीज विद्यार्थ्यांनी कॅम्पसमद्धे विविध फनी गेम्स, सेल्फी पॉइंट, ज्वेलरी स्टॉल तसेच विविध खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉल्सचा आस्वाद घेतला. याचे उद्घाटन श्री. कौस्तुभ सावंत, श्री. गणेश धुरी, श्री. मयूर खानविलकर यांच्या हस्ते झाले.
संपूर्ण युवा महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीनही विभागांचे उपप्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, सांस्कृतिक समन्वयक प्रा. आनंद आंबेकर आणि विद्यार्थी मेहनत घेत आहेत.