गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि नागरी सुरक्षा यंत्रणा,रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील आर्मी आणि नौदल एन.सी.सी छ्त्रांसाठी नागरी संरक्षण पाठ्यक्रम १/२०२२ या कोर्सचे आयोजन ०१ ते ०५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये महाविद्यालयात आयोजित केले होते. रत्नागिरीमधील नागरी सुरक्षा दलातील तत्कालीन प्रभारी सहाय्यक उपनियंत्रक श्री. सुनील सी. मदगे आणि म.के.म्हात्रे यांनी उपनियंत्रक श्री. विजय ब. जाधव यांच्या नेतृत्वाखाली एन. सी. सी. छात्रांना नागरी सुरक्षा दलाची रचना, आपत्ती व्यवस्थापनातील महत्व, त्यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्यां आपत्कालीन सेवा, आपत्तींचे प्रकार, कारणे,परिणाम,राष्ट्रीय,राज्य,व जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे,त्यांची रचना भूमिका,आपत्तीपूर्व, आपत्तीकाल आणि आपत्तीनंतरची कार्ये,अग्नी सुरक्षा यंत्रणा व त्यांची कार्ये,आगीचे प्रकार, त्याची कारणे,अग्निशमन यंत्र वापरण्याच्या पद्धती, विविध प्रकारच्या प्रथमोपचाराच्या पद्धती,जखमी रुग्णांच्या सुरक्षित वाहतुकीच्या पद्धती,इत्यादी विषयावर एकूण ७६ एन.सी सी छात्रांना सविस्तर प्रशिक्षण व्याख्यान आणि प्रात्यक्षिकाच्या आधारे दिले.या प्रशिक्षणाच्या अखेरीस सर्व प्रशिक्षणार्थीची लेखी,तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली.
वरील परीक्षेमध्ये छात्रांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे श्रेणी देऊन या प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे शुक्रवार दिनांक ०९-१२-२०२२ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.पी.कुलकर्णी यांच्या प्रमुख हस्ते आणि श्री विजय ब. जाधव,उपनियंत्रक नागरी संरक्षण रत्नागिरी, श्री लहू गं.माळगावी यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात आली.या कार्यक्रमात एन.सी सी छात्रांना मार्गदर्शन करताना “मानवाच्या पर्यावरणातील वाढत्या हस्तक्षेपामुळे निसर्ग चक्रामध्ये असमतोल निर्माण झाला आहे त्याचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपतींचे प्रमाण वाढत जाणार आहे. अशा आपत्तींना सामोरे जाताना त्यावर मात करण्यासाठी,त्यांच्या व्यवस्थापनासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणती कौशल्ये नागरिकांना माहित असायला पाहिजेत याचे ज्ञान व कौशल्ये नागरी सुरक्षा दलामार्फत दिली जात आहेत.हि जीवन संरक्षक कौशल्ये छात्रांनी प्राप्त केली आहेत त्याचा निश्चित उपयोग समाज, देशासाठी होईल” असे मत व्यक्त केले.तसेच नागरी सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही या दलाने प्रशिक्षित करावे असे आवाहन केले.या कार्यक्रमात श्री विजय जाधव यांनी नागरी सुरक्षा दलाचे रात्नागिरी जिल्ह्यात चालू प्रशिक्षण कार्ये, व विविध कोर्स यांची माहिती दिली. त्यानंतर श्री लहू माळगावी यांनी नागरी सुरक्षा दलात काम करताना आलेल्या अनुभवांच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन विषयावर सविस्तर व्याख्यान दिले.
या कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन लेफ्टनंट अरुण यादव व लेफ्टनंट स्वामिनाथ भट्टर यांनी केले होते.