अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या ‘इतिहास शोध व बोध अभियान’ मंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रा. पंकज घाटे यांनी ‘छत्रपती शाहू महाराज यांचे सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान’ या विषयावर आपले विचार प्रगट केले. शाहू महाराजांनी कला, क्रीडा, नाट्य व संगीत या सर्वच क्षेत्रांना मोलाची मदत केली. उदयोन्मुख कलाकार, गायक, अभिनेते, नाटक मंडळी तसेच मल्ल, कुस्तीच्या तालमी यांना त्या कालखंडात राजाश्रय दिला. त्यामुळे त्या कला व खेळ आज उर्जितावस्थेत आहेत. अनेक गायकी घराणी व नाटके यांचा सुवर्णकाळ म्हणून शाहू महाराजांचा कालखंड ओळखला जातो. कार्यक्रमाला व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य अशोक पाटील, कला विभाग प्रमुख प्रा. डी. आर. वालावलकर, महाविद्यालयाच्या ‘इतिहास शोध व बोध अभियान’ मंडळाचे समन्वयक प्रा. निनाद तेंडूलकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अशोक पाटील यांनी केले.
प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाहू महाराज जनतेचे राजे होते व त्यांनी अनेक सामाजोपयोगी कामे केली हे अनेक उदाहरणांच्या सहाय्याने मुलांना सांगितले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निनाद तेंडूलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, इतिहासाचे विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.