gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जी.जे.सी फिल्म क्लबतर्फे ‘चित्रपट रसास्वाद कार्यशाळा’ संपन्न

दि. १ आणि २ सप्टेंबर २०२३ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या फिल्म क्लबतर्फे चित्रपट रसास्वाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात चित्र मंडळाचे सचिव,ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. संतोष पाठारे ह्यांना या कार्यशाळेकरता साधनव्यक्ती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. एकूण ५५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांची देखील उपस्थिती लाभली. फिल्म क्लबच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. फिल्मक्लब चे विविध उपक्रम, या कार्यशाळेचे उद्दिष्ट याबाबत माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. फिल्म क्लबचे सदस्य प्रा. सचिन सनगरे यांनी डॉ. संतोष पाठारे यांचा परिचय श्रोत्यांना करून दिला.प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून तसेच चित्रपटाची विविध अंगे लक्षात घेऊन एखादा चित्रपट पाहिला असता त्याचा आस्वाद आपण अधिक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो हे समजून घेण्यासाठी हे कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी खूप मोलाची असल्याचे सांगितले. डॉक्टर पाठारे हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांचा परिचय होता परंतु चित्रपटाचे अभ्यास म्हणून त्यांचे कार्य पाहताना देखील आज विशेष आनंद होत असल्याचे प्राचार्यांनी नमूद केले.

प्राचार्यांच्या मनोगतनंतर उद्घाटनाच्या व्यासपीठावर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा. सनगरे यांनी केले. यानंतर प्रत्यक्ष कार्यशाळेला सुरूवात झाली.

एकूण चार सत्रांमध्ये विभागलेल्या या कार्यशाळेत डॉ. पाठारे यांनी चित्रपट रसास्वादाचे विविध टप्पे, चित्रपटाचा आस्वाद घेण्यासाठी श्रोता म्हणून अपेक्षित असलेले विविध गुण, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया, चित्रपटांमध्ये होणारा कॅमेरा आणि ध्वनीचा वापर, कॅमेराचे विविध अँगल्स, कॅमेरा शॉट्स चे वेगवेगळे प्रकार, ध्वनीचे प्रकार, चित्रपटाची संरचना, चित्रपटांचा इतिहास अशा विविध मुद्द्यांबाबत मार्गदर्शन केले. याकरता वेळोवेळी विविध निवडक फिल्मची उदाहरणे देत, प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून, त्यांना विचार करायला लावून त्यांना बोलतं करून चित्रपट रसास्वाद करण्याच्या दृष्टीने त्यांना पहिले पाऊल टाकायला शिकवले. डॉ. पाठारे यांनी स्वतः लिहलेली आणि दिग्दर्शित केलेली ऋतूपर्णो घोष यांचे वरील डॉक्युमेंटरी आणि कोलाहल ही शॉर्ट फिल्म पाहण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळाली.

दि. २ सप्टेंबर २०२३ रोजी कार्यशाळेची सांगता झाली. यावेळी श्रावणी महाकाळ, वेदांत सावर्डेकर, सेजल मेस्त्री, रूजन जाधव, विजय सुतार या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. चित्रपट पाहण्याबाबत एक नवा दृष्टिकोन मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून सांगितले आणि त्याकरिता मार्गदर्शक डॉ. पाठारे यांचे मनापासून आभार मानले.

या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुलकर्णी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. फिल्म क्लबच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन तसेच सर्व सहकारी शिक्षक सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांनी कार्यशाळेच्या आयोजना करता मेहनत घेतली.

चित्रपट रसास्वाद कार्यशाळा चित्रपट रसास्वाद कार्यशाळा
Comments are closed.