रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील(स्वायत्त) मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त दि. १९ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राची लोकपरंपरा ‘तमाशा आणि वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक कीर्तीचे फोटोग्राफर, पत्रकार व लेखक संदेश भंडारे यांनी या विषया संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयाच्या ज.शं.केळकर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कलाशाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी, मार्गदर्शक संदेश भंडारे, वैशाली भंडारे व मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग सातत्याने भाषा संवर्धनासाठी आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांसाठी कसा कार्यरत असतो हे विशद केले. महाराष्ट्राला लोकपरंपरांचा खूप मोठा वारसा आहे. अनेक लोककला व लोकपरंपरा लोककलावंतानी जीवापाड जपल्या आहेत. हा समृद्ध अनुभव संदेश भंडारे यांनी छायाचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उलगडून दाखविला. महाराष्ट्रातील विविध भागात सादर होणारा तमाशा, त्यातील लोककलावंतांचे जगणं, प्रेक्षकांचा प्रतिसाद याविषयी संदेश भंडारे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तमाशा बरोबरच वारी, वारकऱ्यांचा वारीतील सहभाग, वारीत सादर होणारे विविध खेळ यावरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी तमाशा व्यवस्थापन, महाराष्ट्रभरातील तमाशाचे प्रारूप कळले आणि वारीची अनुभूती चित्रदर्शनाने मिळाली म्हणूनच आपण एक तरी वारी अनुभवली पाहिजे असे आवर्जून प्रतिपादन केले.
मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भाषाप्रेमी विद्यार्थी आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार मानले.






Visitors Online : 2