महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सामाजिक माध्यमांचा वाढता वापर आणि वाढते सायबर गुन्हे यांचा विचार करून विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी आणि सबंधित कायदे यांची जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने ‘सायबर क्राईम विरोधी जाणीव जागृती’ या विषयावर गोगटे जोगळेकर महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. संगणकशास्त्र, समाजशास्त्र आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत प्रा. प्रशांत लोंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी इंटरनेट, सायबर गुन्हेगारी म्हणजे नक्की काय?, युवकांनी या गुन्ह्यांच्या प्रभावापासून स्वत:चे कसे संरक्षण केले पाहिजे तसेच सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार आणि त्याविरोशी असणारे शासनाचे कायदे, महाविद्यालयीन युवकांनी बाळगावयाची दक्षता या संबंधी विस्तृत आणि प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले. ऑनलाईन फसवणूक, अश्लील चित्रफिती, खोटी वा चुकीची माहिती, जाणीवपूर्वक त्रास देणे, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा दुरुपयोग, बक्षिसांचे आमिष देणारे मेसेज, पोर्नोग्राफी अशा अनेक सायबर गुन्हे घडणाऱ्या बाबींची सविस्तर माहिती दिली. यावेळी कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे तरून पिढी कळत नकळतपणे सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकते. या संबंधात घ्यावयाची काळजी आणि दक्षता तसेच कायद्याचे स्वरूप यामुळे युवकांना सायबर गुन्हेगारीपासून आपला आणि आपल्या प्रियजनांचा बचाव कसा करता येईल याचे विस्तृत विवेचन केले.
याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील प्राध्यापकांचे आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले. प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला कला शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.