रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त सोमवार दि. १७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ५.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष असून यावर्षी थोर शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारच्या भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. भिकू रामजी उर्फ दादा इदाते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राष्ट्रपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वसमावेशक विचार आणि वर्तमान भारतीय समाज’ या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वस्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी नियमितपणे व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेत आजपर्यंत मुंबई तेथील डॉ. टी. के. टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. रोकडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासारख्या थोर विचारवंतांची व्याख्याने संपन्न झाली आहेत. विद्यमान वर्षी थोर शिक्षणतज्ज्ञ मा. श्री. भिकू रामजी उर्फ दादा इदाते व्याख्यानाचे पाचवे पुष्प गुंफणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन भूषविणार आहेत.
या कार्यक्रमप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे धुंडिराज जोगळेकर, जयश्री कुळ्ये, कश्ती शेख, ओंकार वाळूंज यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. स्पर्धेचे परिक्षक प्रा. बाबासाहेब कांबळे आणि प्रा. अनिल उरुणकर होते. कनिष्ठ महाविद्यालयीन गटात निबंध स्पर्धेत अनुक्रमे तृषाली सोनावणे, रोशनी कांबळे, सुकन्या गोसावी यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक तर ओंकार ओक, गौरी भडवळकर, अझिया सोलकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परिक्षक प्रा. वैभव कानिटकर आणि प्रा. नानासाहेब हाके होते.
वरिष्ठ महाविद्यालयीन गटात वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे राजदीप कदम, प्रियल जाधव, तैबा बोरकर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परिक्षक प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. कृष्णात खांडेकर होते. वरिष्ठ महाविद्यालयीन गटात निबंध स्पर्धेत अनुक्रमे सुमित आंबेकर, सुर्यकांत ऐवळे, विजय बिळूर यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावले. तर छाया लाड, प्रणाली सावंत व तिरसिंग ठाकरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. या स्पर्धेचे परिक्षण प्रा. तुळशीदास रोकडे आणि डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. शहरातील नागरिक तसेच विजेते विद्यार्थी यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.