तरुणाईच्या आकर्षणाचा केंद्र असलेल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘झेप’ या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या दिमाखात व उत्साहात सुरुवात झाली. एकाच वेळी अनेक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या या महोत्सवाचे पहिल्या दिवशीचे आकर्षणाचे केंद्र ठरले ते म्हणजे खातू नाट्यगृहांमध्ये संपन्न झालेली विविध प्रकारच्या गीतांनी बहरलेली “नृत्य स्पर्धा”. सुरुवातीच्या गीत गायनाच्या कार्यक्रमानंतर युवकांना मोठ्या उत्साहात थिरकायला लावणाऱ्या या नृत्य स्पर्धेमध्ये जुन्या व नवीन हिंदी मराठी चित्रपटांच्या गीतावर स्पर्धकांबरोबर विद्यार्थीप्रेक्षकही थिरकले. ‘ओढणी ओढे ओढे’ पासून ‘तेरा चेहरा ‘, ‘मुंगळा मुंगळा’ पासून ‘लडकी ब्यूटीफुल है’ पर्यंत अनेक रंगतदार गीतांवर नृत्यकला सादर करण्यात आली. क्लासिकल, वेस्टन, रीमिक्स अशा विविध प्रकारच्या गीतांवर तरूणाईने मोठ्या उत्साहात जल्लोष केला. कार्यक्रमांमध्ये “बाबा” या आगळ्यावेगळ्या गीतावर नृत्य करत असताना शुभम नंदानी याने अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणले. शेवटी देशभक्तीपर गीताच्या साखळी नृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली.
एकेरी व दुहेरीनृत्य प्रकारांत रंगलेली ही स्पर्धा उपस्थित तरुणांचे आकर्षण ठरली. एकेरी नृत्य स्पर्धेत शुभम नंदानी प्रथम, अभय जंगम द्वितीय, तर ऋत्विक सनगरे याने तृतीय क्रमांक पटकाविला. दुहेरी नृत्य स्पर्धेमध्ये आरडीएस ग्रुपने प्रथम, मीरा खालगावकर आणि मनाली मनवाडकर यांनी द्वितीय, तर शिवानी भडेकर व वैष्णवी काटकर यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना IQAC विभागाचे समन्वयक डॉ राजीव सप्रे व विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे यांच्या हस्ते पारितोषिकांनी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेला सपना साप्ते व अंकिता प्रभू-पाटकर परीक्षक म्हणून लाभल्या होत्या.कार्यक्रमाचे आयोजन द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थ्यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय चाळके, अपूर्वा आचार्य ,ओंकार भागवत, अनाहिता साळवी, शिरीन काझी यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे कौतुक व अभिनंदन प्राचार्य डॉ किशोर सुखटणकर यांनी केले कार्यक्रमाच्या संयोजनात सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा आनंद आंबेकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.