गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. आनंद आंबेकर यांनी ‘रत्नागिरी जिल्ह्यातील परिचारिकांच्या भूमिका’ या विषयासाठी शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र विभागाकडून डॉक्टरेट जाहीर करण्यात आली. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. उषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम करण्यात आले.
परिचारिकांच्या रुग्णसेवा संदर्भातील भूमिका संघर्ष अभ्यासणे, सहकारी परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी यांच्यासोबत काम करताना निर्माण होणारे संघर्ष अभ्यासणे, शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील
परिचारिकांच्या भूमिकांच्या तणावाची तफावत अभ्यासणे, परिचारिकांच्या भूमिकांमध्ये संघर्षात्मक परिस्थितीला संवाद कौशल्य जबाबदार आहे का याचा अभ्यास करणे असे उद्देश संशोधनासाठी समोर ठेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील शासकीय रुग्णालयांतील १०० परिचारिका आणि खाजगी रुग्णालयायातील ५० परिचारिकांच्या मुलाखती घेऊन चिकित्सक अभ्यास करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्याचा विशेष अभ्यास करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा सांख्यिकी कार्यालयातून, जिल्हा परिषद आरोग्य विभाग कार्यालयातून तसेच रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातून माहिती घेऊन सदर अभ्यासाठी उपयुक्तता वाढविण्यासाठी चिकित्सक अभ्यास करण्यात आला. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेवरील आलेला ताण सर्वज्ञात आहे. अशाप्रकारच्या अत्यंत महत्वाच्या काळात परिचारिका आपली रुग्णसेवा सर्वोत्तमरीतीने बजावत असतात; त्यामुळे हे संशोधन महत्वपूर्ण आहे.
डॉ. आनंद आंबेकर यांच्या याशाबाद्द्ल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. त्यांना विविध स्तरातील मान्यवर आणि संस्थांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.