‘भारतीय समाजाच्या जडणघडणीत जाती व्यवस्था ही केंद्रीयस्थानी राहिली असून दुर्दैवाने समाजस्वास्थ्यास ती मारक ठरली. यासाठी जातीच्या निर्मितीपासून तिचा विकस आणि जातीअंत या विषयाची विश्लेषक मांडणी डॉ. आंबेडकर यांनी केली’ असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ समाजशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. बालाजी केंद्रे यांनी केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८व्या जयंती कार्यक्रमानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर होते.
आपल्या चिकित्सक विश्लेषणात डॉ. केंद्रे पुढे म्हणाले की, जातीअंतर्गत विवाहाच्या नियमांनी जातीबहिर्गट विवाहावर वर्चस्व मिळविले. प्रत्येक जातीने संकर आणि साधनसुचीतेच्या दृष्टीकोनातून स्वत:च्या जातीगटावर बंधने घातली. त्यामुळे प्रत्येक जात एक बंदवर्ग बनली आणि तीच व्यवस्था पुढे ताठर होत गेली. अशा जातीव्यस्थेला ताठर करण्यामध्ये मनुस्मृतीने महत्वाची भूमिका बजावली. जातीव्यास्था ताठर करण्याच्या उद्देशाने सतीप्रथा, केशवपन यासारखी बंधने स्त्रियांवर लादली गेली. त्यामुळेच स्त्रिया जातीव्यस्थेच्या प्रवेशद्वारावर आहेत असा सिद्धांत डॉ. बाबासाहेबांनी पुढे मांडला. लाहोरच्या जातपात तोडक मंडळाने आयोजित केलेल्या परंतु न झालेल्या डॉ. बाबासाहेबांच्या व्याख्यानाचा दाखला देत डॉ. बाबासाहेब यांची जातीअंताची भूमिका किती व्यापक होती यावर डॉ. केंद्रे यांनी प्रकाश टाकला. सहभोजनाच्या प्रस्थापित पर्यायांतून जातीअंत शक्य असून तो आंतरजाती विवाहानेच शक्य होईल यावर डॉ. आंबेडकरांचा विश्वास होता. राज्यघटनेच्या माध्यमातून मुलभूत अधिकार, वेगवेगळी कलमे आणि राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वांतून जातीव्यस्थेने शोषण केलेल्या समाजास केंद्रस्थानी ठेऊन बाबासाहेबांनी समतेवर आधारित समाजनिर्मितीसाठी मोठे योगदान दिले आहे असे डॉ. केंद्रे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर म्हणाले, आंतरजाती विवाहाच्या माध्यमातून जातीव्यास्थेची घट्ट चौकट शिथिल होण्यास मदत होईल म्हणून शासन, सामाजिक संस्था या पातळीवर प्रयत्नशील आहेत. समाजातील सर्वच सदस्यांनी या बाबीचा गांभीर्याने व मनमोकळेपणाने विचार केल्यास या स्थितीत सुधारणा होईल असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शाहू मधाळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या निमित्ताने कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले व विज्ञान विभागात कार्यरत असलेल्या डॉ. सोनाली कदम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. रामा सरतापे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.