भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील द्रष्टे नेते होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतअस्पृश्यतेचे चटके सोसत बाबासाहेबांनी आपले शिक्षण पूर्ण केले. भारतातील वैविध्यपूर्ण समाजाचा अभ्यास करून शोषित-वंचितांचे नेते म्हणून ते पुढे आले. आपले संपूर्ण आयुष्य समाजातील दीन-दलितांसाठी खर्च करून राज्यघटनेच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. समाजातील असमानता, विषमता मिटविण्यासाठी त्यांनी संविधानात अनेक तरतुदी करून ठेवल्यात.आधुनिक भारताच्या नवनिर्मितीसाठी त्यांनी दिलेला संविधानिक रथ आपण पुढे नेउयात, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील स्वरचित कविता सादर केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी कुलकर्णी होते. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी आपले उभे आयुष्य समतेसाठी वेचले. त्यांचे विचार, चारित्र्य आणि चरित्र संपूर्ण समाजाला प्रेरणादायी, बोध घेण्यासारखे आहे. आपणसर्वजण आत्मनिर्भर होऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावुयात, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन गणित विभागाचे प्रा. दिवाकर करवंजे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला, वाणिज्य, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य अनुक्रमे डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा सकपाळ, विविध विभागप्रमुख, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर आदि मान्यवरआणि विद्यार्थी उपस्थित होते.