भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३३ व्या जयंती निमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम वाचन कक्षात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय कार्यक्रम समितीचे समन्वयक डॉ. शिवाजी उकरंडे यांनी करून दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. हरिसिंग गौर केंद्रिय विद्यापीठ, सागर, मध्यप्रदेश येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश कांबळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारांची वर्तमान प्रस्तुतता’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपले विचार मांडताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थविषयक विचार, धोरण, समकाळात त्याची असलेली प्रस्तुतता यावर प्रकाश टाकला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दूरदृष्टी असलेले आंतरराष्ट्रीयख्यातीचे अर्थतज्ज्ञ होते. भारतातील तत्कालीन आणि भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचा अभ्यास करून त्यांनी आपले अर्थविषयक विचार व भूमिका मांडली. भारताच्या विकासाच्या धोरणांचा पाया घालण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. देशाचा औद्योगिक विकास झाला तरच अर्थविकासाला गती प्राप्त होईल, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. भारताच्या आर्थिक नियोजनाच्या इतिहासात डॉ. बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेबांचे अर्थधोरण आणि त्यांचे विचार समजून घेऊन त्यादृष्टीने पावले उचलली पाहिजेत असे मत डॉ. प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच समग्र भारतीयांच्या उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेबांनी केलेले कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रमुख व्याख्याते डॉ. प्रकाश कांबळे, शास्त्र, वाणिज्य व कला शाखांच्या उपप्राचार्या, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तसेच कार्यक्रम समितीचे समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. तृप्ती धामणस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.