भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागात अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी होत्या. उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, डॉ. आंबेडकर यांचे विचार संपूर्ण समाजाला प्रेरणादायी असे आहेत. अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी दलित समाज, अल्पसंख्यांक आणि महिला यांच्याकरिता कल्याणकारक तरतुदी संविधानात करून ठेवल्या आहेत. संविधानाचे निर्माते म्हणून त्यांचे देशाला भरीव असे योगदान आहे. एक अभ्यासू विद्यार्थी संशोधक, समाजशास्त्रज्ञ, पत्रकार, कायदेतज्ज्ञ, वकील, केंद्रीय मंत्री, संविधाननिर्माते म्हणून डॉ. आंबेडकर सर्वांना परिचित आहेत; असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन राज्यशास्त्र विभागाचे प्रा. निलेश पाटील यांनी केले. याप्रसंगी विभागातील प्रा. सिद्धिका पिलणकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.