गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. मागासवर्गीय विद्यार्थी पुस्तक पेढी योजनेत सहभागी विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगासाठी पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले. तसेच ‘वाचक गट’ या वाचन प्रेरणा देणाऱ्या विद्यार्थीप्रिय उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्य-कर्तृत्ववाचा आढावा घेतला. ग्रंथालयशास्त्राला जगभर मान्यता प्राप्त करून देणाऱ्या व्यक्तींमध्ये डॉ. रंगनाथन यांना प्रमुख स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयीन ग्रंथालयाविषयी माहिती देताना त्यांनी ग्रंथालयाच्या विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये पुस्तक संख्या, विविध विभाग, विविध पुस्तक पेढी योजना, ऑनलाइन पुस्तके आणि जर्नल्स, ग्रंथालयाची संगणक प्रणाली तसेच संगणक कक्ष यांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ग्रंथालय समिती समन्वयक आणि महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके, त्यांचे महत्व आणि वाचनाची सवय याविषयी मार्गदर्शन विस्तृत असे केले. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आपले ज्ञान वाढविण्यासाठी हे विद्यार्थी दशेत नियोजनबद्ध प्रयत्न करायला पाहिजेत असे सांगितले. ‘सातत्याने केलेले वाचन भविष्यात तुम्हाला निश्चितच एका उंचीवर नेऊन ठेवेल’ असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यानंतर मागासवर्गीय विद्यार्थी पुस्तक पेढी योजनेत सहभागी झालेल्या विविध विद्याशाखेतील ३१ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांतर्फे प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना पुस्तक पेढी योजेतील सहभागी विद्यार्थिनी कु. वैष्णवी श्रीनाथ (तृतीय वर्ष कला) हिने आणि वाचक गटात सहभागी विद्यार्थिनी कु. सिद्धी साखळकर (प्रथम वर्ष कला) यांनी उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाविद्यालय, महाविद्यालयातील सर्व सेवा सुविधा आणि ग्रंथालय एकत्रितपणे काम करत आहेत; उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवून आणणे होय.डॉ. रंगनाथन यांच्याविषयी माहिती सांगून त्यांच्याविषयी आजच्या त्यांच्या जयंतीदिनी आपली आदरांजली व्यक्त केली. बदलते शैक्षणिक धोरण आणि आपले महाविद्यालय याविषयी महत्वाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. ‘वाचक गट’ या विद्यार्थीप्रिय आणि वाचनाला अधिक प्रवृत्त करणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन झाले असे त्यांनी जाहीर केले. ‘विद्यार्थ्यांनी उत्तम आणि परिपूर्ण अशा महाविद्यालयीन ग्रंथालयाचा आपल्या शैक्षणिक जीवनात जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा’; असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी तर आभारप्रदर्शन वाचक गटातील सहभागी विद्यार्थी कु. ओंकार आठवले (द्वितीय वर्ष कला) याने केले. कार्यक्रमाला मान्यवर, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.