gogate-college-autonomous-updated-logo

आत्मियतेतून व्यवस्थांचे सक्षमीकरण : डॉ. सोनाली कदम

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या NSS विभागाच्या विशेष निवासी शिबिराच्या आजच्या तिसऱ्या दिवशी चांदेराई येथे डॉ. सोनाली कदम यांनी प्रज्ञा परिसर प्रकल्प या विषयांतर्गत एक कार्यशाळा घेतली. शिबीरार्थींशी संवादात्मक चर्चेतून आपलं महाविद्यालय, आपण राहत असलेलं शहर, आपला देश याबद्दल ममत्व, तेथील सगळ्या नागरिकांविषयीची आत्मीयता कशी वाढवता येईल याविषयीचं महत्व स्वयंसेवकांना अवगत करून दिलं.

या कार्यशाळेचाच एक भाग म्हणून स्वयंसेवकांच्या गटांमधून त्यांना विविध उपक्रम देऊन त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षा, गरजा, त्यावरील संभावित उपाय आणि हे उपाय करायचे ठरवले तर स्वयंसेवक त्यात कसे योगदान देऊ शकतील याचाही एक आढावा घेतला. या उपक्रमांसाठीचे विविध विषय हे शिक्षक विद्यार्थी सहसंबंध दृढ करणे, विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण आनंदाने घेता यावे, महाविद्यालयातील शिस्त, विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा असणाऱ्या वैयक्तिक समस्या जाणून घेणे, आपला सांस्कृतिक विभाग, आपला जिमखाना विभाग असे विषय मुलांना चर्चेसाठी दिलेले होते. शिबीरार्थींनी आपापल्या गटात अतिशय उत्तम  चर्चा करून विविध उपाय आणि त्यांचा त्यातील सहभाग याबद्दल सादरीकरण केले.

चर्चात्मक कार्यशाळा असल्याने स्वयंसेवक  उत्सुकतेने सहभागी झाले. ही कार्यशाळा स्वयंसेवकांच्या प्रत्यक्ष सहभागामुळे अतिशय यशस्वी झाली. या कार्यशाळेत प्रा. परेश गुरव यांनी डॉ. सोनाली कदम यांना सहकार्य केले.

Comments are closed.