मुंबई विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी नुकतीच गोगटे जोगळेकर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. डॉ. सुहास पेडणेकर यांचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयातर्फे सत्कार केला. याप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक आणि अभ्यासेतर उपक्रमांचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या संशोधन प्रयोगशाळेसाठी जपानमधून आयात करण्यात आलेल्या ‘शिमाजू’ कंपनीच्या अत्याधुनिक अशा एच.पी.एल.सी. या प्रयोगशाळेतील अतिशय उपयुक्त असे उपकरण विज्ञात व तंत्रज्ञान विभागाच्या एफ.आय.एस.टी. या अनुदानातून घेण्यात आले आहे. सदर उपकरण मा. डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते कार्यान्वित केले गेले. याप्रसंगी बोलताना त्यांनी या उपकरणाचा शोधप्रकल्प आणि इतर संशोधन कार्यासाठी सुयोग्य वापर करण्याचे आवाहन केले आणि अनुदानित शोधप्रकल्प करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावित याकरिता उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर संपन्न झालेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचार्यांच्या कार्यशाळेमध्ये आपले मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी विद्यापीठाचे कामकाज अधिक उत्तम होण्याकरिता आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवशकता आहे असे सांगितले. यासाठी सर्वांचे सहकार्य आपल्याला लागणार आहे असे सांगून त्यांनी विद्यापीठाच्या नियोजित कामकाजाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते.