रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रतिवर्षी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि उत्तम प्रशासक कै. डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीनिमित्त ‘विज्ञान व्याख्यानमाला’ आयोजित केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली. व्याख्यानमालेचे हे ३५वे वर्ष असून विद्या प्रसारक मंडळाचे आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन संस्था, ठाणे येथील प्राध्यापक आणि अधिष्ठाता डॉ. सुधाकर आगरकर यांनी यावर्षीच्या व्याख्यानाचे पुष्प गुंफले. २०२०-२१ हे वर्ष थोर गणिती शास्त्रज्ञ रामानुजन यांच्या पुण्यतिथीचे १०१वे वर्ष आहे; याचे औचित्य साधून सदर व्याख्यानमालेसाठी ‘रामानुजन- अनंत वेध घेणारा भारतीय गणिती’ असा विषय घेण्यात आला. रामानुजन आणि आणि त्यांचे गणित विषयातील उत्तुंग योगदान याचे विस्तृत विवेचन डॉ. आगरकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या शैलीत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी केले. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी सभागींना संबोधित केले.
डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी कै. डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला तर डॉ. उमेश संकपाळ यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक भिडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. विदुला भोसले यांनी केले. या व्याख्यानमालेला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.