मुंबई विद्यापीठातर्फे नुकतेच २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील विविध पुरस्कार जाहिर करण्यात्त आले. त्यामध्ये ‘सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका’ हा मनाचा पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या तसेच व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. यास्मिन खालिद आवटे यांना प्रदान करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या फिरोजशाह मेहता सभागृहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहोळ्यात डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. आवटे या गेली २३ वर्षे महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत आहेत. त्यांनी आतापर्यंत महिलांची प्रगती, विकास तसेच सबलीकरण या अंगांनी केलेल्या कार्याचा तसेच योगदानाचा विचार करून विद्यापीठातर्फे त्यांची निवड करण्यात आली. वरील क्षेत्रात कार्य करताना त्यांनी महाविद्लाय आणि विद्यापीठ पातळीवर वुमेन डेव्हलपमेंट सेलची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. राज्य स्तरीय जागर जाणिवांचा या कार्यक्रमात सक्रीय सहभाग आणि दोनवेळा महाविद्यालयाला अनुक्रमे रु. ५०,००० व रु. १,००,००० चे पारितोषिक प्राप्त करून दिले, महिला बचत गट या विषयावर संशोधन कार्य केले, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये महिलांशी निगीडीत विविध विषयांवर संशोधन लेखांद्वारे सादरीकरणासह सहभाग घेतला, विद्यापीठाच्या वुमेन डेव्हलपमेंट सेलच्या सहकार्याने कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये कार्यशाळांच्या माध्यमातून महिलांच्या बाबतीतील अत्याचार याविषयी जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले; अशा अनेक प्रशंसनिय कामांची पोचपावती म्हणजे त्यांना मिळालेला हा पुरस्कार होय.
या पुरस्काराविषयी कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी र. ए. सोसायटीकडून मिळालेले सहकार्य आणि पाठींबा तसेच प्राचार्यांकडून वेळोवेळी मिळालेले सहकार्य आणि प्रोत्साहन तसेच सर्व कुटुंबियांचा सक्रीय पाठिंबा यांचा उल्लेख करून या सर्वांमुळेच हे यश प्राप्त करू शकले याचा आवर्जून उल्लेख केला.
डॉ. आवटे यांच्या यशाबद्दल सर्व स्तरांवर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.