गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा ‘झेप’ हा एक अविभाज्य महोत्सव आहे. या महोत्सवात महाविद्यालयातील विविध शैक्षणिक विभागांमार्फत उपयुक्त प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनांमध्ये विद्यार्थी आपापल्या विभागांतील विषयांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती इतर विभागातील विद्यार्थ्यांना सुलभरित्या समजावून देत असतात. गेली सहा वर्षे महाविद्यालयाचा प्राणीशास्त्र विभाग या प्रदर्शनांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी बजावत आहे. यावर्षी विभागाने ‘प्राणीशास्त्रातील विविध संकल्पनांची झलक’ या विषयावरील माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित केले आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे कमांडर अलोक लांजे, कमांडर नीलकंठ खोंड आणि मेजर विश्वनाथ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, राष्ट्रीय छात्र सेनेचे डॉ. सीमा कदम, प्रा. अरुण यादव, प्राणीशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या प्रदर्शनात तृतीय वर्ष प्राणीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने विविध प्रयोग, उपकरणे आणि अनेक मॉडेल्समार्फत प्राणीशास्त्र विषयात अभ्यासल्या जाणाऱ्या विविध शाखा आणि संकल्पनांची माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही प्राणीशास्त्र विभागाचे हे शैक्षणिक प्रदर्शन झेप महोत्सवाचे आकर्षण बनले आणि सर्वांची मने जिंकली.