रत्नागिरी शहर व बाजूच्या परिसरातील माध्यमिक शाळांमधील इंग्रजीच्या शिक्षकांसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘क्षमता विकसन कार्यशाळा’ नुकतीच संपन्न झाली. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाविद्यालयाला देण्यात आलेल्या श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय या दर्जासाठी देण्यात आलेल्या अनुदानातून सदर कार्यशाळा महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे आयोजित करण्यात आली.
‘इंग्रजीचे शिक्षक हे कोणत्याही शाळेचा एक महत्वाचा आधारस्तंभ असतात. वैश्विक पातळीवर ज्ञानभाषा म्हणून मान्यता असणाऱ्या या भाषेचा हा क्षमता संपन्न होणे हे व्यक्तिगत त्याच्या तसेच शाळेच्या दृष्टीने खूप जमेची गोष्ट असते. या शिक्षकांमध्ये स्वतःच्या विषयाबद्दल तसेच कामाबद्दल आत्मप्रतिष्ठेची भावना निर्माण व्हावी हा या प्रकारच्या कार्यशाळांचा उद्देश असल्याचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी सांगितले.
तीन सत्रांत विभागलेल्या या कार्यशाळेत प्रारंभी विभाग प्रमुख डॉ. अतुल पित्रे यांनी कार्यशाळेचे नियोजन, आनंददायी शिक्षण, कृती आधारित पाठ्यक्रम, तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षण व्यस्थेतील होणारे बदल, मल्टीमीडिया तंत्राचा वापर यावर त्यांनी भाष्य केले. यानंतर प्रा. वैभव कानिटकर, प्रा. स्नेहल मेस्त्री आणि प्रा. मधुरा दात्ये यांनी मार्गदर्शन केले. रत्नागिरीतील शाळांमध्ये इंग्रजीचे अध्यापन सुधारण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चासत्र संपन्न झाले. यामध्ये श्री. अश्फाक नाईक, प्रा. वासुदेव आठल्ये, सौ. श्रीसुंदर, संजना तारी, रश्मी लोहार यांनी मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. या चर्चेची फलश्रुती म्हणून रत्नागिरीतील माध्यमिक शाळांतील इंग्रजी शिक्षकांचा एक संघ स्थापन करावा असे सूची केले व सर्वानुमते ‘रत्नागिरी इंग्लिश टीचर्स असोसिएशन’ची स्थापना करण्याचे ठरविण्यात आले.
समारोप समारंभात कार्यशाळेतील सहभागी शिक्षकांनी त्यांच्या मनोगतातून आपल्याला नवी दिशा, नवे उपक्रम मिळाल्याचे सांगून समाधान व्यक्त केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी विभागातील गुणवत्ताधारक आजी-माजी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या नियोजनात प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विभाग प्रमुख डॉ. अतुल पित्रे यांचे मार्गदर्शन आणि प्रा. दत्तात्रय कांबळे आणि प्रा. तेजस भोसले यांचे उत्तम सहकार्य लाभले.