gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गावखडी येथे कासवसंवर्धन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रभेट

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे निसर्ग मंडळाचा ‘कासवसंवर्धन’ हा उपक्रम नुकताच गावखडी येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कोकण किनाऱ्याला लाभलेल्या नैसर्गिक वारशाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात जागरूकता निर्माण करणे तसेच समुद्री कासवांचे संवर्धन करणे इ. या क्षेत्रभेटीचे प्रमुख उद्देश होते. जमिनीवरील कासव, गोड्या पाण्यातील सासव आणि समुद्री कासव असे कासवांचे प्रमुख प्रकार आहेत. यातील पाच प्रकारची कासवे भारतीय उपखंडात आढळून येतात. यापैकी चार प्रजाती भारताच्या समुद्रकिनारी आढळून येतात.

वाढती कारखानदारी, प्रदूषण, मासेमारी, मानवाकडून किनारी भागाचा होणारा बेसुमार वापर, कासवांच्या पाठीचा दागिन्यांसाठी होणारा वापर यामुळे समुद्री कासवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आणि अशीच परिस्थिती भविष्यात चालू राहिली तर कासव हा प्राणी दुर्मिळ प्रजातींमध्ये मोडला जाऊ शकतो. या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कासवांच्या पिल्लांचे जतन करून त्यांना समुद्रात सोडले जाते.

रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथे श्री. डिंगणकर यांच्या देखरेखीखाली कासवांच्या पिल्लांचे जतन करून त्यांना समुद्रात सोडले जाते. कासवांच्या अंडी घालण्यापासून ते अंड्यातून बाहेर येण्याच्या काळापर्यंत या अंड्यांचे संरक्षण केले जाते. हा कालावधी साधारणत: ४२-४५ दिवस इतका असतो. सदर पिल्ले ही सुरक्षितरीत्या प्राणीमित्रांकडून सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तासमयी समुद्रात सोडली जातात.

या ‘कासवसंवर्धन’ उपक्रमामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे प्रा. अतिका राजवाडकर, प्रा. हर्षदा मयेकर, प्रा. मयुरेश देव, प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गावखडी येथे कासवसंवर्धन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रभेट
Comments are closed.