भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय क्रिडा आणि युवा कार्य मंत्रालयातर्फे आयोजित ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0’ मध्ये गोगटे महाविद्यालयाच्या नौदल राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांनी सहभाग नोंदवला. ब्रिटिशांच्या 150 वर्षे गुलामगिरीविरुद्ध भारतीय जनतेने मोठ्या निकराने लढा दिला. अनेक राजकीय पुढारी-नेते, समाजातील विविध घटकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. प्रसंगी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. अखेरीस प्रदीर्घ अशा लढ्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. विद्यमानवर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण देशात साजरे करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारतीय क्रिडा आणि युवा कार्य मंत्रालयातर्फे ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0’ दि. 13 ऑगस्ट ते दि. 2 ऑक्टोंबर 2021 या कालवधीत या राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील नौदल राष्ट्रीय छात्र सेना विभाग आणि 2 महाराष्ट्र नेव्हल राष्ट्रीय छात्र सेना युनिट, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने छात्रांसाठी शुक्रवार दि. 13 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे जवाहर क्रिडांगण ते भाट्ये समुद्रकिनारा असे ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या एन.सी.सी. च्या 20 S.D.आणि 10 SW छात्रांनी सहभाग घेतला.
महाविद्यालायाचे प्र. डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी दौड सुरू करण्यासाठी झेंडा दाखवल्यानंतर छात्रांनी भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष करत दौड सुरू केली. कार्यक्रमाची समाप्ती जवाहर क्रिडांगणावर एन.सी.सी. छात्रांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतल्यानंतर झाली. याप्रसंगी एन.सी.सी. ऑफिसर लेफ्ट. अरुण यादव, कॅप्टन सीमा कदम, आणि एन.सी.सी युनिटमधील सर्व ट्रेनिंग ऑफिसर उपस्थित होते.