gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न ज्ञानप्रबोधिनी, पुणे तर्फे युवकांना प्रशिक्षण

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ज्ञानप्रबोधिनी, पुणे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने लिंग समभाव आणि संवेदनशीलता विषयक कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोप समारंभात बोलताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी जागतिक स्तरावर लिंगसमभाव संदर्भातील विविध प्रश्न आणि त्याचे संबंधित देशांना होणारे फायदे विषद केले. बदलत्या कालखंडात राष्ट्रीय योगदानासाठी समाजात लिंगसमभावाची असणारी आवश्यकता आणि त्यासाठी विद्यार्थी दशेतील आपली जबाबदारी याचे विस्तृत असे मार्गदर्शन केले.

समाजातील लिंगभाव विषयक समस्यांनी विविध प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होतात, विशेष करून स्त्री-पुरुष विषमता आणि भेदभाव. लिंगसमभाव संदर्भातील विविध विषयांची ओळख व्हावी, सोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबत त्यांचे वक्तृत्व कौशल्य, समाजात जावून काम करण्याची मानसिकता व प्रत्यक्ष तयारी व्हावी यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. दैनंदिन प्रसंगाच्या नाट्यपूर्ण सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी युवा अवस्थेतील विविध प्रश्नांची मीमांसा केली. मैत्री, प्रेम, विवाह, लैंगिक मोहाचे क्षण, ताणताणाव, व्यसनाधीनता, एकटेपणा, फावल्या वेळाचे नियोजन या विषयांची सखोल चर्चा आणि मार्गदर्शन ज्ञानप्रबोधिनीमार्फत करण्यात आले.

यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लिंगसमभाव संवेदनशीलतेच्या माध्यमातून या प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केले गेले होते. ज्ञानप्रबोधिनीमार्फत घेण्यात आलेल्या विविध अभ्याससत्रांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिंगभाव प्रश्नावली, स्व-ओळख, गुणकौशल्याचा विकास, व्यक्तिमत्व विकास, पंचमय कोश विकास, स्त्री-पुरुष जननेंद्रिय ओळख, एच.आय.व्ही.-एड्स या विषयांची माहिती लघुपट, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन व गट कृतीसत्राच्या माध्यामातून देण्यात आली.

वयात येणाऱ्या मुलांच्या मनातील प्रश्न, मैत्री विषयक योग्य विश्वासाचे वातावरण, ताण-तणाव व्यस्थापन या विषयांवर विशेष गट कृतिसत्र घेण्यात येऊन विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे योग्य मार्गाने मिळविण्यासाठी प्रेरित करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनीमार्फत दिपाली शेंडे, अनघा लवळेकर, प्रणिता जगताप आणि संतोष जानराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ज्ञानप्रबोधिनी, पुणे मार्फत कार्यान्वित या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० विद्यार्थी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

प्रशिक्षणार्थी श्वेता आंब्रे (तृतीय वर्ष कला) हिने ‘सदर प्रशिक्षणात सहभागी झाल्याने माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मला मिळाली’, यापुढे कसे वागावे याची शास्त्रीय माहिती येथे मिळाली; अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर कौस्तुभ काळे (प्रथम वर्ष कला) याने ‘सदर प्रशिक्षणात सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेसंदर्भात विश्लेषण कसे करता येते याचा अनुभव आला.’ आपण आता इतरांना मार्गदर्शन करू शकतो असा विश्वास निर्माण झाला आहे; अशी आपली प्रतिक्रिया दिली.

Comments are closed.