gogate-college-autonomous-updated-logo

शिक्षण संस्थांनी उद्योगप्रधान शिक्षण देण्याची गरज – उद्योगमंत्री नाम. उदय सामंत

gjc-baburao-joshi-din-programme-2022

सद्यस्थितीत शिक्षण संस्थांनी पारंपरिक अभ्यासाबरोबरच प्रदेशाच्या गरजा ओळखून उद्योगप्रधान शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीने त्यासाठी पुढाकार घेऊन कोकणच्या विकासासाठी विद्यार्थांसाठी उद्योगप्रधान अभ्यासक्रम राबवावे, असे मत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नाम. श्री. उदय सामंत यांनी येथेव्यक्त केले. र. ए. सोसायटीचे संस्थापक कै. ज. वा. तथाबाबुराव जोशी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

र. ए. सोसायटीतर्फे महाविद्यालयाच्याराधाबाई शेट्येसभागृहात नुकताच कै. बाबुराव जोशी यांचा १२५ वा जयंती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगमंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करतानाना. उदय सामंत पुढेम्हणाले,रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्य समर्पित वृत्तीचे असून, संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेची कार्यशैली, संघभावनेबद्दल कौतुकास्पद भाष्य केले. भविष्यात संस्थेला जेव्हा काही मदत लागेल तेव्हा आपण त्यासाठी सदैव तत्पर असू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी.जी.पी.एस.च्या विद्यार्थ्यांनी गीतकार किरण जोशी आणि श्री. विजय रानडे यांनी संगीतबद्ध केलेले स्वागत गीत सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात संस्थेचे सचिव श्री. सतीश शेवडे यांनी र. ए. सोसायटीच्या स्थापनेपासूनचा आजपर्यंत केलेल्या प्रगतीचा लेखाजोगा मांडला.

दीपप्रज्वलनानंतर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अमृत वर्षानिमित्तप्रा. डॉ. चित्रा गोस्वामी आणि त्यांच्या नेतृत्त्वाखाली संपादक मंडळाने संपादित केलेल्या मराठी. हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा चार भाषेतील महाविद्यालयातील शिक्षक-विद्यार्थांनी रचलेल्या ‘अमृतधारा’ या७५ कवितांच्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर यांनी संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची उद्घोषणा केली. त्यात कै. बाबुराव जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, कै. मालतीबाई जोशी आदर्श लिपिक पुरस्कार सौ. प्रियांका धरणे, रा. भा. शिर्के प्रशाला, कै. मालतीबाई जोशी आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार श्री. सुधीर भोरे, र. ए, संस्था कार्यालय यांना प्रदान करण्यात आला. यानंतर तिन्ही पुरस्कारप्राप्त सत्कारमूर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रा. भा. शिर्के प्रशालेचा विद्यार्थी कु. आयुष काळे याचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडाप्रकारांमध्ये उल्लेखनीयकामगिरी केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात, कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी या ध्येयवेड्या दांपत्याने १९२५ मध्ये महिला महाविद्यालयाच्या रूपाने शिक्षणाच्या क्षेत्रात रोवलेल्या या बीजाचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या संस्थेची कीर्ती जगभरात पसरली असून, संस्थेचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्व वाटचालीत संस्थापकांचा दूरदर्शीपणाचा संस्था जीवनातील महत्व स्पष्ट करून भविष्यातही ही संस्था आपली उज्वल परंपरा अशीच पुढे नेत राहील, अशी आशा व्यक्त केली. त्यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, आपण ते कराल. आपण या संस्थेला आणखी मोठे करू, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी यांनी संस्थापक कै. बाबुराव जोशी यांच्या जीवनातील धैर्यपूर्ण, खंबीर आणि स्थितप्रज्ञ वृत्तीचे दर्शन घडविणारे मोजके प्रसंग अत्यंत हृद्य पद्धतीने कथन केले. ज्यामुळे कै. बाबुरावांचे समग्र जीवनदर्शनच सर्व उपस्थितांपुढे उभे राहिले.

याप्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. मुकुंदराव जोशी, कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष ऍड. विजयराव साखळकर, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, आजीव सभासद मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. मकरंद साखळकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले, तर प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमात र. ए. सोसायटीचे सर्व पदाधिकारी, गोगटे जोगळेकर वरिष्ठ आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक वर्ग, र. ए.सोसायटीच्या सर्व घटक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी र. ए. सोसायटीचे पदाधिकारी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, विजयकुमार काकतकर, सेवक वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments are closed.