डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर आणि डॉ. भालचंद्र उदगावकर या आंतरराष्ट्रीय भौतीक शास्त्रज्ञांचे संशोधनातील कार्य हे आईनस्टाईन यांच्या संशोधनाच्या दर्जा इतके श्रेष्ठ होते. डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर आणि डॉ. उदगावकर यांनी त्यांचे आयुष्य संशोधनासाठी आणि विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वाहून घेतले असे मत मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांनी व्यक्त केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. वी. के. बावडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयात दरवर्षी शास्त्र शाखेतील संशोधनाच्या नव्या संधी / घडामोडी याविषयी विध्यार्थ्यांना माहिती व्हाव्यात हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. यंदा या व्याख्यानमालेचे ३६ वे पुष्प मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांनी गुंफले.
सुरुवातीला अनंत देशपांडे यांनी पद्मभूषण डॉ. भालचंद्र उदगावकर यांचे भौतीक शास्त्राचे शिक्षक, संशोधक, शिक्षणतज्ञ, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एजुकेशन, भुवनेश्वर येथील भौतिकशास्त्र संस्था या सर्व कार्याचा उल्लेख केला. तसेच विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीचे डॉ. उदगावकर यांचे मराठी विज्ञान परिषदेतील कार्यासमंधी माहिती दिली.
त्यानंतर अनंत देशपांडे यांनी पद्मश्री, पद्मभूषण डॉ. वसंत गोवारीकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. डॉ. गोवारीकर यांचे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) चे प्रमुख, पंतप्रधान पी. वी. नरसिम्हा राव यांचे वैज्ञानिक सल्लागार (१९९१-९३) पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून केलेले कार्य, मराठी विज्ञान परिषदेचे कार्य तसेच fertilizer encyclopaedia (२००८) या विशेष कार्याचा आढावा घेतला.
त्यानंतर अनंत देशपांडे यांनी पद्मश्री, पद्मभूषण पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या कार्या विषयी माहिती दिली. डॉ. नारळीकर यांची होयले – नारळीकर थेरी. आंतर विध्यापिठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक शास्त्र केंद्र (IUCCA), याविषयी माहिती दिली. तसेच विज्ञान विषय सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी लिहिलेल्या शेकडो पुस्तकांचा उल्लेख केला.
तसेच त्यांच्या शिकवणी संदर्भातील रंजक आठवणी सांगितल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. म्हादये यांनी, प्रास्ताविक शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. प्रा. रुजुता गोडबोले यांनी बावडेकर सर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक (Ph.D. Guide) म्हणून मान्यता मिळालेल्या डॉ. स्वामिनाथ भट्टार (रसायन शास्त्र) डॉ. सोनाली कदम (वनस्पती शास्त्र) डॉ. भूषण ढाले (भौतिक शास्त्र) आणि डॉ. रामा सरतापे (अर्थशास्त्र) यांचा तसेच स्टार DBT समितीचे समन्वयक डॉ. विवेक भिडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धामध्ये पारितोषिके मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. वनश्री तांबे यांनी या पुरस्कार वितरणाचे सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी भूषविले. प्राचार्य कुलकर्णी यांनी डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर, आणि डॉ. उदगावकर यांनी केलेल्या संशोधन कार्याचा उल्लेख केला. तसेच या मान्यवरांचे देश निर्मितीतील मोलाचे योगदान असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे आजी माजी शिक्षक, प्राध्यापक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रसायन शास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मयूर देसाई, डॉ. उमेश संकपाळ, डॉ. स्वामिनाथ भट्टार, डॉ. मेघना म्हादये, प्रा. प्रतीक्षा बारसकर, प्रा. निकिता पोवार, प्रा. अंकित सुर्वे, प्रा. बरीन आवटे, प्रा. रीना शिंदे, प्रा.तृप्ती जोशी, शिक्षकेतर कर्मचारी प्रशांत मुरकर, जगदीश जाधव, तानाजी बेडक्याळे, पंडित सोनावणे, अनंत यादव भीमरत्न कांबळे या सर्वांनी तसेच महाविद्यालयाच्या प्रशासकीय कर्मचारी यांनीही उत्साहाने सहभाग घेतला.