gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील औषधी वनस्पती व रानभाज्यांच्या प्रदर्शनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे प्रतिवर्षी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यमानवर्षी महाविद्यातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे नुकतेच महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाच्या अभ्यासिका विभागात औषधी वनस्पती आणि रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७२ औषधी वनस्पती, आजीबाईंचा बटवा तसेच ३८ औषधी उपयोग असलेले मसाल्याचे पदार्थ आणि १५ प्रकारच्या रानभाज्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. डिकेमाली, तिपाणी, चांदेडा, चित्रक इ. औषधी वनस्पती, आजीबाईंचा बटवामध्ये सुंठ, वेखंड, तुळस, बाळंतशेप, जायफळ, शहाजिरे इ. वनस्पती आणि रानभाज्यांमध्ये तेरडा, भारंगी, घोळ, थरभर, करटोली इ. भाज्यांचा समावेश होता. सदर प्रदर्शन विद्यार्थी, शिक्षक व विविध शाळांमधील विद्यार्थी आणि नागरिक यांच्यासाठी खुले होते. या प्रदर्शनाला जी.जी.पी.एस. आणि शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे १५० विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विविध वनस्पतींची महिती प्राप्त केली. शहरातील वनस्पतीप्रेमी, पर्यावरणप्रेमी आणि निसर्गाविषयी आत्मीयता असणाऱ्या अनेक नागरिकांनी सदर प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली. वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनीही विविध औषधी वनस्पती व रानभाज्यांच्या उपयोगाविषयी मार्गदर्शन केले.

औषधी वनस्पती व रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी, ‘अशाप्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनांतून विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती प्राप्त करून त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत’ असे आवाहन केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींचे महत्व आणि त्यांच्यापासून औषधी द्रव्यांचे वर्गीकरण कसे करायचे याची माहिती दिली. यावेळी विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शरद आपटे यांनी प्रदर्शनातील औषधी वनस्पती व रानभाज्यांविषयी विस्तृत अशी शास्त्रीय माहिती दिली.
प्रदर्शनाच्या माहिती संकलन आणि वनस्पतींच्या मांडणीसाठी डॉ. सोनाली कदम, प्रा. ऋजुता गोडबोले, प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे, प्रा. परेश गुरव या वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला वनस्पतीशास्त्र विभागातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तम सहकार्य केले.

Comments are closed.