गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील हिन्दी विभागाचे प्रमुख, पीएच.डी. संशोधन केंद्राचे समन्वयक, कला शाखेच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. शाहू मधाळे यांना नागपूर येथील ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे’ त्यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नुकताच ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याबाबत त्यांना नुकतेच संस्थेच्या पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
डॉ. शाहू मधाळे गेली २९ वर्षे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ज्ञानदानाचे कार्य करत असून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. आतापर्यंत त्यांची यशपाल के उपन्यास और राष्ट्र, यशपाल के उपन्यास और राजनीती, समकालीन हिन्दी कहानियों का वैचारिक परिप्रेक्ष हे तीन संदर्भग्रंथ; शब्द के मोती, शब्द सूर हे दोन कविता संग्रह; शब्द सौरभ कथा संग्रह; हिन्दी के विकास में हिन्दी और हिन्दीतर भाषियोंका योगदान हे संपादित पुस्तक तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये त्यांचे ३४ शोधनिबंध प्रकाशित झाले असून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांमध्ये ५७ शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत. यू.जी.सी. व मुंबई विद्यापीठअंतर्गत अनुदानित विविध लघु व बृहत संशोधन प्रकल्पांचे त्यांनी यशस्वी लेखन केले आहे. सध्या त्यांचे अनेक विषयांवर लेखन कार्य सुरु आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिन्दी अभ्यास मंडळावर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पीएच.डी. विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य सुरु आहे. त्यांना यापूर्वी फिनोलेक्स अकादमी या संस्थेद्वारे ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. विविध सामाजिक संघटनांमध्ये ते विविध पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक, आर्थिक साहाय्य केले आहे.
दि. २७ मार्च २०२२ रोजी आठव्या वर्धापन दिनी ‘जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळातर्फे’ हा पुरस्कार नागपूर येथे नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत डॉ. शाहू मधाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी अभिनंदन केले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.