एखादी व्यक्ति प्रज्ञावंत आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्या व्यक्तिचा बुद्ध्यांक (Intelligence Quotient) चांगला आहे असे गृहित धरतो मात्र त्यावेळी त्याच्या भावनांकांचा (Emotional Quotient) सुद्धा विचार व्हावा असे आपल्याला वाटत नाही. आताच्या कृत्रिम स्पर्धेच्या आभासी आणि अवास्तव युगात विद्यार्थ्याच्या मनाला भावनांकांशी जोडून प्रज्ञावान लोकांच्या यादीत सामावून घेणे गरजेचे आहे. मुलांनी त्यांच्या स्वतःच्या भावना ओळखणे, भावनार्थ समजून घेणे, भावना समजून त्यांचे योग्य नियोजन करणे आणि त्या माध्यमातूनच निर्धारित ‘ध्येया’ चा मार्ग चोखळणे आताच्या पिढीला जमले पाहिजे. मुलांमध्ये परस्पर परावलंबित्व असावे पण त्याच बरोबर जिव्हाळा युक्त जोडलेपण वाढीस लागले पाहिजे. जसे सांगितले जाते की आताशा माणसे एकमेकांच्या संपर्कात (contact) असल्याचे वाटते पण ते एकमेकांशी भावनिक दृष्ट्या जोडलेले (connected) असतीलच असे नाही. आजची पिढी ही अशा कोरड्या सामाजिक परिस्थती मध्ये वाढते आहे. घरातून पाठवतात म्हणून ते शाळा कॉलेज मध्ये जातात अभ्यास करतात किंवा करत नाहीत.. त्या त्या क्षेत्रातील अनुभव घेतातच असे नाही, स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्यांना स्पर्धेची भीती वाटते ते आत्मविश्वास हरवून बसतात किंबहुना काही वेळा स्पर्धेत अव्वल स्थानावर असलेले सुद्धा स्वतःची ओळख विसरतात…आत्मविश्वास हरवून बसतात.अशा मुलांच्या आयुष्यात चैतन्य यावे, त्यांच्या सामाजिक सभोवतालची जबाबदारी पेलण्याचे भान आणि सक्षमता त्यांच्या मध्ये यावी यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी , शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था, पुणे (MSFDA) अंतर्गत डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाने ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. र. प. गोगटे आणि र. वि. जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. बिना कळंबटे, डॉ. सोनाली कदम, डॉ. अजिंक्य पिलणकर, विद्यार्थी प्रतिनिधी कु. वैष्णवी केळकर, कु. मयूर लोके आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री. ओंकार पोंक्षे यांना सदर पाच दिवसांच्या कार्यशाळेला उपस्थित राहण्याची संधी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि विज्ञान शाखा उप प्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी दिली.
या कार्यशाळेत सहभागी झाल्यावर भावना आणि मूर्त – अमूर्त मन यांची नव्याने ओळख झाली. विचार, भावना आणि वर्तन या मनाच्या समभुज त्रिकोणाच्या बाजू आहेत. त्यातील एक बाजू जरी भंगली तरी मन आणि शरीर यावर त्याचा परिणाम होतो आणि भरकटले पण येते. आताची पिढी स्व-केंद्रित आहे.जरी लैंगिक विषमतेला दूर सारून युवक-युवती मध्ये सहज आणि दृढ मैत्री आहे असे जाणवले तरी जिव्हाळा असेलच असे नाही. किंबहुना विपरीत परिस्थितीत ‘मी आणि माझा भोवताल’ या कोषा मध्ये अडकून इतरांबद्दल उदासीनता दिसून येते. याचे परिणाम त्यांच्या भावी आयुष्यात भोवताना दिसतात. प्रत्येकच जण करियरच्या शोधात आणि पैसे कमावण्याच्या स्पर्धेत असताना एकमेकांपासून दुरावलेला दिसतो. या हरवलेल्या आणि स्वतःपासून दुरावलेल्या युवकाला त्याची स्वतःची ओळख मिळवण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा यांचे भान ठेऊन स्वतःपासून दुरावलेल्या त्याच्या मनामध्ये पुन्हा चैतन्य निर्माण होऊन त्याच्या ध्येय पर्यंत पोचण्यासाठी शिक्षण संस्थेतील प्रत्येकानेच मदत करणे गरजेचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक स्व संवाद चालू असतो. तो संवाद होकारार्थी (स्व-संवाद नियंत्रित करणे) व्हावा इष्ट ध्येयापर्यंत पोचावणारा व्हावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. युवकांचे श्रेयस आणि प्रेयस एकजीव व्हायला पाहिजे. सुख आणि आनंद यातील साम्य आणि भेद कळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
अध्यापनाची सर्वसामान्य तत्त्वे अध्यापनाच्या विविध पद्धतींचे विश्लेषण करताना शिक्षकाची महत्त्वपूर्ण भूमिका याचा विशेष विचार होऊ लागला आहे. अलीकडच्या काळात शिक्षकाच्या विशिष्ट वर्तनप्रकारांचा व अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अध्ययनावर कसा परिणाम होतो, याविषयी संशोधन झाले. तसेच अध्ययनविषयक प्रेरणेवर प्रभाव पाडणारे विविध घटक, अध्यापनपद्धतीमुळे अध्ययनात निर्माण होणारी गोडी, अध्यापनातील तंत्रज्ञान यांवर अधिक भर देण्यात आला आहे. व्यक्तिभेदाच्या तत्त्वाबरोबरच व्यक्तिकेंद्रित विचारसरणी पुढे आली. शैक्षणिक व व्यावसायिक सल्ला व मार्गदर्शनाची अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना रूजली गेली आहे.
व्यक्तीच्या सुप्तगुणांचा पर्याप्त विकास होऊन ते सक्षम होण्यासाठी ज्या ज्या गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे असते, त्या त्या सर्व गोष्टींचा विचार महाविद्यालयाच्या परिसरातच व्हावा अशी ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’ ची योजना आहे. यामध्ये महाविद्यालयात विविध कार्यक्रम जे पारंपरिक औपचारिक पद्धतीने घेतले जातात त्याला अनौपचारिक रूप देऊन एखादा ‘कट्टा’, ‘पार’ किंवा ‘चौक’ या ठिकाणी कार्यक्रम करावेत आणि अनौपचारिक गप्पांमधून वक्त्यांचे विचार विद्यार्थ्यां पर्यंत पोचण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी किंवा त्यांच्याशी संवाद साधून निदान त्याच्या मनाचा निचरा व्हावा यासाठी योग्य ते व्यासपीठ किंवा स्वतःशी संवाद साधण्यासाठी शांततापूर्ण दालनाची व्यवस्था महाविद्यालयात केली जाणे अपेक्षित आहे. किंबहुना महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना येणाऱ्या अडचणी मूळे कदाचित त्यांच्या मनात एकूणच व्यवस्थेविषयी दहशत बसते आणि विद्यार्थी मनाने महाविद्यालया पासून दुरावतो. असे होऊ नये यासाठी महाविद्यालयातील आधीचे विद्यार्थी या नवीन विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनतील अशी योजना आहे. प्रगत संशोधनामुळे प्रत्यक्ष शास्त्रीय चाचण्या आणि त्यांचे निष्कर्ष यातून वाढत्या वयाच्या मुलांच्या मनोवृत्तींचा, विकासाचा, क्षमतांचा व अध्ययन पद्धतींचा अभ्यास यांवर भर देण्यात आला आहे.
मानवी विकासात आनुवंशिकता आणि त्याच्या सभोवतालचे वातावरण या दोहोंची भूमिका महत्त्वाची आहे, असा निष्कर्ष मान्य झाला आहे. शास्त्रशुद्घ विश्लेषणामुळे आनुवंशिकता आणि भोवतालची परिस्थिती, या दोन्ही घटकांच्या अंतर्गत असणाऱ्या अनेक बाबी उजेडात येऊन त्यांच्यातील आंतरक्रीयेची गुंतागुंत लक्षात आली. व्यक्तिविशिष्टता व व्यक्तिभेद यांना महत्त्व प्राप्त झाले. अध्ययनाच्या बाबतीत मनासारख्या कल्पित गोष्टी मागे पडून मेंदूचा विचार होऊ लागला. शरीर व मेंदूचे कार्य यांचा परस्परसंबंध तसेच व्यक्तीचे वर्तन यांचा साकल्याने विचार होऊ लागला. अध्यापनही अध्यापक केंद्रित न राहता विदयार्थी केंद्रित बनले. पूर्वी अध्यापनासंबंधीचे सर्व निर्णय अध्यापक स्वतःच घेई पण आता विदयार्थ्यांची क्षमता, अभिक्षमता, कल, अध्ययनक्षमता, वय यांनुसार शिकवावे असा दृष्टिकोन प्रभावी ठरला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या आणि अशा प्रकारे विद्यार्थ्याला आपण शिकत असलेल्या परिसराबबत आत्मीयता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त वेळ महाविद्यालयात राहून त्याला ‘स्व’ ची ओळख व्हावी असे वातावरण निर्माण केले जाणार आहे. आताशा निदर्शित अध्ययनाची कल्पना अधिक मान्यता पावत आहे. अध्ययनासाठी पोषक उपयुक्त अशी वातावरणनिर्मिती करणे, तसेच अध्ययनाला साहाय्य करणे म्हणजे अध्यापन, अशी विचारसरणी आता रूढ झाली आहे. अध्यापकाचे व्यक्तिमत्त्व व अध्यापनाची कौशल्ये यांसंबंधी झालेले संशोधन लक्षात घेऊन अध्यापन पद्धती मध्ये बदल केले गेले आहेत.शैक्षणिक मानसशास्त्रातील सैद्धांतिक विकासही वेगाने होत राहिला. परंपरागत शिस्तीच्या संकल्पना व सिद्धांत बदलू लागले. याचा परिणाम म्हणून विद्यार्थी केंद्रित अभ्यास पद्धतीत ‘स्वयं’ केंद्रित (centripetal) विद्यार्थ्याला ‘सर्व’ केंद्रित (centrifugal) बनवण्यासाठी त्याच्या अनुभवाचे क्षेत्र विस्तारित करून चैतन्य आणि आत्म विश्वास पूर्ण अशी पिढी निर्माण व्हावी यासाठी ‘प्रज्ञा परिसर प्रकल्प’ राबविला जात आहे.
डॉ. सोनाली कदम
सहयोगी प्राध्यापिका,
गोगटे जोगळेकर महाविद्यालय,
रत्नागिरी.