gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे – जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांना श्रद्धांजली

gjc-ex-principal-dr-subhash-deo-shradhanjali

र. ए. सोसायटीच्या गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. र. ए. सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्राचार्य डॉ. सुभाष देव हे गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९९५ ते २०१४ या कालावधीत ते महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २०१४ मध्ये ते प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवेच्या कार्यकाळात प्राचार्य म्हणून कार्य करताना त्यांनी महाविद्यालयाला सक्षम नेतृत्त्व देण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या आणि मुंबई विद्यापीठाच्या अनेक समित्या, आस्थापनांवर काम करताना त्यांनी अनेक मोलाच्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. ते काही काळ मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे नियंत्रकही होते.

रत्नागिरीमध्ये प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी शिक्षण विस्ताराचे कार्य अखंडपणे पार पाडले. विषयावरील प्रभुत्व, ज्ञानाची खोली, विषयाचे चिकित्सक विश्लेषण, शिस्तप्रिय शिक्षक, कुशल प्रशासक असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. महाविद्यालयाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरलेले प्राचार्य डॉ. देव हे ज्ञानाचा अनमोल खजिना होते. त्यामुळे ते विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. रत्नागिरी शिक्षण संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्रगतीच्या शिखरावर नेण्यात त्यांचा सिंहाचावाटा आहे. अतिशय शिस्तप्रिय स्वभावाचे, कामाचा ध्यास घेतलेल्या प्राचार्य देव सरांनी शेकडो विद्यार्थी घडविले, त्यांच्या अकाली जाण्याने रत्नागिरी आणि कोकण विभागाच्या शैक्षणिक वर्तुळाचे खूप नुकसान झाले आहे, असे मत प्राचार्य देव यांच्या स्मृतींना उजाळा देताना उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

या प्रसंगी व्यासपीठावर र. ए. सोसायटीच्या कार्यध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, उपकार्याध्यक्ष अ‍ॅड. विजय साखळकर, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, माजी विद्यार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी श्री. राजन मलुष्टे आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, प्रा. माधव पालकर, श्री. नाना पाटील यांनी प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.

या श्रद्धांजली सभेला संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, विविध विभागांचे प्रमुख आणि शिक्षकेतर कर्मचारी, र. ए. सोसायटीच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. तेजश्री भावे यांनी केले. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून हा कार्यक्रम संपन्न झाला.

Comments are closed.