भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा सांगता कार्यक्रम आणि महाविद्यालयातील ‘जीजेसी फिल्म क्लब’चे उद्घाटन शनिवारी सेमिनार हॉलमध्ये पार पडले. या प्रसंगी नीला माधब पांडा दिग्दर्शित ‘आय एम कलाम’ चित्रपट विद्यार्थांना दाखविण्यात आला.
जीजेसी फिल्म क्लबच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित रत्नागिरी फिल्म सोसायटीचे डॉ नितीन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “चित्रपट हा पाहून सोडून देण्याचा विषय नाही तर अभ्यासाचा विषय आहे. अशा कला निर्मितीसाठी शेकडो लोकांचा हातभार लागलेला असतो. तसेच चित्रपट समीक्षा ही एक कला आहे. चित्रपट ‘चळवळ’ म्हणून पुढे यावी प्रयत्नपूर्वक कार्य केले पाहिजे”, असा आशावाद व्यक्त केला. आपल्या प्रास्ताविकात बोलताना महाविद्यालयाच्या जीजेसी फिल्म क्लब विभागाच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन यांनी चित्रपट आणि समाज हे समोरासमोर लावलेले आरसे आहेत हे सांगत विद्यार्थांना या क्षेत्रात असलेल्या संधी, उत्तम साहित्यातून उत्तम चित्रपटांची निर्मिती, यासाठी लेखन संधी, चित्रपटाशी संबंधित जनजीवन आणि विद्यार्थी यांचा समन्वय स्पष्ट केला. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट चित्रपट विद्यार्थांना पाहता यावेत यासाठी हा विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत बँक ऑफ महाराष्ट्राचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. आनंद शंकर यांनी बँकांच्या माध्यमातून समाजाची केली जाणारी सेवा तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रांगणातील बँक आणि विद्यार्थांना शिक्षणासोबत भविष्यातील व्यवसाय रोजगारासाठी सेवा सुविधांची उपलब्धी याची माहिती दिली. फिल्म क्लबच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. फिल्म क्लब माध्यमातून महाविद्यालयास ६५ इंची टीव्ही साठी प्रायोजकत्व दिल्याबद्दल महाविद्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव सप्ताहाची सांगता फिल्म क्लबच्या माध्यमातून होते आहे याबद्दल शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील अभ्यासेतर उपक्रमही विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासात कसे उपयुक्त ठरतात या संबंधी मार्गदर्शन केले.
सामुहिक राष्ट्गीत गायनानंतर चित्रपट दाखविण्यात आला. चित्रपट समाप्तीनंतर विद्यार्थांनी आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया नोंदविल्या. या प्रसंगी कलाशाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील अधिकारी श्री. कैलास राहाडे, झोनल ऑफिसर श्री. गोंधळी, फिल्म क्लब समिती सदस्य प्रा. प्रतीक शितुत, प्रा. मधुर दाते, प्रा. स्वप्नील जोशी, प्रा. सचिन सनगरे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. दर्शना काळे, कु. श्रावणी करंदीकरसह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.