gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त संपूर्ण देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्रिटिशांच्या १५० वर्षे गुलामगिरीविरुद्ध भारतीय जनतेने मोठ्या निकराने लढा दिला. अनेक राजकीय पुढारी-नेते, समाजातील विविध घटकांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. प्रसंगी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता स्वातंत्र्यलढ्यात स्वतःला झोकून दिले. अखेरीस प्रदीर्घ अशा लढ्यानंतर १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. विद्यमान वर्ष हे भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण देशात साजरे करण्यात येत आहे. भारतीयस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारत सरकारच्या वतीने ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रव्यापी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. मान. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हरघर तिरंगा’ या अभियानाची घोषणा केली असून, या अंतर्गत दि. १३ ते १५ ऑगस्ट, २०२२ दरम्यान देशातील २४ कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल. यानिमित्त शासन परिपत्रकानुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विविध शाखा आणि विभागाच्यावतीने दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२२ या दरम्यान समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता सामुदायिक राष्ट्रगीत गायन करण्यात येणार आहे. दि. १० ऑगस्ट रोजी राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागांच्यावतीने थिबा राजवाडा आणि लोकमान्य टिळक स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दि. ११ ऑगस्ट रोजी समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थी आपापल्या वर्गात आपले राष्ट्र, गाव, शहर यांचा इतिहास, माहिती घेऊन कथन करणार आहेत. तसेच वाणिज्य विभागाच्यावतीने पोस्टर मेकिंग, वर्ग खोल्यांची सजावट, लेखन स्पर्धा इ.चे आयोजन करणार आहेत. दि. १२ ऑगस्ट रोजी मराठी, संस्कृत, हिंदी आणि वाणिज्य विभागाच्या वतीने अनुक्रमे देशभक्तीपर वक्तृत्व, निबंध, चित्रकला, मूकनाट्य, स्कीट, गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि. १३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्यावतीने महाविद्यालयीन परिसराची स्वच्छता तर विभाग पातळीवर अंतर्गत स्वच्छता करण्यात येणार आहे. याच दिवशी वाणिज्य विभागाच्या वतीने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन विस्तारविभाग, नेचर क्लब विभागाच्यावतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला असून, शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्थामार्फत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी सहभागी होणार आहे. दि. १५ ऑगस्ट रोजी प्रतीवर्षाप्रमाणे महाविद्यालयात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित पोलीस संचलनात सहभागी होणार आहे. याच दिवशी सांस्कृतिक विभागाच्या वतीने महाविद्यालयात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन, भित्तीपत्रक प्रदर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १६ ऑगस्ट रोजी स्वराज्य महोत्सव सांगता समारोह संपन्न होणार असून, या दिवशी महाविद्यालयातील फिल्म क्लबच्यावतीने डॉ. ज. शं. केळकर सभागृहात देशभक्तीपर चित्रपटाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच वाणिज्य विभागाच्यावतीने स्वच्छता मोहीम अभियान आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग आणि विद्यार्थी यांनी उस्फुर्तस हभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे. हा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने आपण यशस्वी करून दाखवू, अशी ग्वाही प्राचार्यांनी कार्यक्रम नियोजन सभेप्रसंगी उपस्थितांना दिली.

Comments are closed.