प्रतिवर्षी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे विविध प्रकारच्या हिन्दी स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर हिंदी भाषेशी सबंधित इतर उपक्रमांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी हिंदी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर ‘पत्रकारिता प्रमाणपत्र’ अभ्यासक्रम घेण्यात आला. या विविध स्पर्धा व प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची पारितोषिके व प्रमाणपत्रे या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली.
यामध्ये विशेषत्वाने राष्ट्रभाषा हिंदी एकता दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हिंदी निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक अनुक्रमे कल्पेश आत्माराम पारधी, सोनाली मनोहर बुरबाडकर, प्राची राजेश सनगाळे व उत्तेजनार्थ पारितोषिक ईश्वरी मनोहर वाडकर, मुकेश प्रमोद सनगरे व लीना विनायक पाध्ये यांनी पटकावले. सदर निबंध स्पर्धेचे परीक्षण डॉ. चित्रा गोस्वामी व प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले होते. तसेच ‘विश्व हिंदी दिनानिमित्त’ घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीनाथ उमेश कुलकर्णी, द्वितीय क्रमांक प्रिय शुक्रराज हळदणकर आणि तृतीय क्रमांक अन्वी अवधूत साळवी यांनी पटकवला. तर उत्तेजनार्थ पारितोषिक अमर रमेश पवार, लक्ष्मी इरय्या स्वामी यांनी पटकावले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. जयंत अभ्यंकर, प्रा. कृष्णात खांडेकर आणि प्रा. सचिन सनगरे यांनी केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी केली. त्यांनी महाविद्यालयाच्या हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगर राजभाषा कार्यान्वय समितीचे अध्यक्ष व बँक ऑफ इंडिया, रत्नागिरीचे प्रादेशिक महाप्रबंधक श्री. केशव कुमार यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानाची आवश्यकता कशी असते याविषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नगर राजभाषा कार्यान्वय समितीचे सदस्य व बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी राजभाषा विभागाचे वरिष्ठ प्रबंधक श्री. निरंजन कुमार समरिया यी हिंदी भाषेचे महत्व सांगत ती रोजगाराभिमुख कशी आहे हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी महाविद्यालयाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेला उजाळा देत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी महाविद्यालयाची भूमिका स्पष्ट करीत पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे व हिंदी विभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कृष्णात खांडेकर व आभारप्रदर्शन डॉ. दानिश गनी यांनी केले. या कार्यक्रमास बँक ऑफ इंडियाचे मार्केटिंग अधिकारी श्री. धीरज मोरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच हिंदीप्रेमी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.