gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये कालिदास दिन संपन्न

gjc-kalidas-din-july-21

दरवर्षी आषाढ शुद्ध प्रतिपदेला सर्वत्र कालिदास दिन साजरा केला जातो. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही हा दिवस दरवर्षी उत्साहाने साजरा होतो. यावर्षी संस्कृत विभागाचा विद्यार्थी श्री. सुश्रुत धनंजय चितळे याने ‘मला भावलेले कालिदासाचे रघुवंश’ या विषयावर व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी भूषविले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्कृत विभागप्रमुख डॉ.कल्पना आठल्ये यांनी कालिदास दिनामागची संकल्पना उलगडून सांगितली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विभागातील पदव्युत्तर पदवी प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्याला कालिदास दिनाच्या दिवशी व्याख्यानाची संधी दिली जाते. या वर्षी व्याख्यान देणार्या श्री. सुश्रुत धनंजय चितळे यांचा परिचयही डॉ. आठल्ये यांनी करून दिला.

दिनांक ११ जुलै २०२१ रोजी गुगल मीटच्या माध्यमातून हे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानामधून सुश्रुतने रघुवंशावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासाचा परामर्श घेत आपले विचार व्यक्त केले. कालिदासाचा काळ, रघुवंशातून सूचित होणारी ऐतिहासिकता, भौगोलिक आणि पर्यावरणाचे संदर्भ, राजनीति, शासक म्हणून आजच्या नेतृत्वालाही आवश्यक ठरणारे रघुराजांचे आदर्श गुण आणि कालिदासाची सहज शैली यामुळे रघुकुलतिलक ठरणारा रघुवंश मला अधिक भावल्याचे सुश्रुतने आवर्जून सांगितले.

महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीतही विद्यार्थ्यांच्या संशोधनपर सुरू असलेल्या अभ्यासाबद्दल समाधान व्यक्त केले आणि सुश्रुतने मिळालेल्या संधीचा उत्तम उपयोग केल्याबद्दल कौतुक केले तसेच कार्यक्रम यशस्वी कर विद्यार्थ्यांचेही कौतुक केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ कु. आर्या केळकर हिच्या मेघदूतातील पहिल्या दोन श्लोकांवरील नृत्याविष्काराने झाला. कु.सायली मुळ्ये हिने या श्लोकांना संगीतबद्ध करून गायन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन कु. प्रीती टिकेकर हिने केले. कु.ऐश्वर्या आचार्य हिने गायलेल्या शांतिमंत्राने या कार्यक्रमाची सांगता करत कालिदासाच्या प्रतिभेचा हा उत्सव संपन्न झाला.

या कार्यक्रमाला कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेन्द्र ठाकूरदेसाई, विविध विषयांचे प्राध्यापक, संस्कृत विभागाचे आजी व माजी विद्यार्थी, संस्कृत विषयाची आवड असणारे महाविद्यालयातील अन्य शाखांचे विद्यार्थी, संस्कृत विषय अभ्यासणारे नागरिक असे १०० हून अधिक संस्कृतप्रेमी उपस्थित होते.

Comments are closed.