gogate-college-autonomous-updated-logo

कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ प्रज्ञावान विद्यार्थी अथर्व तायशेटे; प्रज्ञावान विद्यार्थिनी भाग्यश्री यादव तर मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी श्रेया भालेकर

KTS Final Exam

‘विद्यार्थ्यांनी जीवनात कोणत्याही प्रकारच्या अपयशाने खचून न जाता आपले ध्येय गाठावे’ असे आवाहन श्री. मितेश घट्टे, अपर पोलीस अधिक्षक, रत्नागिरी यांनी केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या प्रज्ञावान विद्यार्थांना संबोधित करताना ते बोलत होते. विस्तीर्ण सागरी किनारा लाभलेल्या कोकणाला याठिकाणी निर्माण होणारे अधिकारी खऱ्या अर्थाने गरजेचे आहेत. वीस वर्षांपूर्वी या परीक्षेच्या बीजाची पेरणी करताना तत्कालीन बुजुर्गांचेही हेच स्वप्न होते; आपण सर्व विद्यार्थी कोकणाचे निश्चितच उज्ज्वल असे भवितव्य आहात, याची मला खात्री आहे. आपण स्वत: इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ते इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक असा प्रवास करताना अधिक सक्षमपणे समाजसेवा करता यावी या उद्देशाने स्पर्धा परीक्षांची कास धरून पोलीस सेवेत दाखल झालो या आपल्या या शैक्षणिक प्रवासाचा त्यांनी आढावा घेतला. आपले काही वैयक्तिक अनुभवही त्यांनी कथन केले. शिक्षक आणि पालक यांचे नाते कसे असावे हे त्यांनी विषद केले. विद्यार्थांनी आपली सुखाची कल्पना साकार करताना स्वातंत्र्यपूर्व काळातील विद्यार्थांचे ध्येय अजिबात दुर्लक्षित करू नये, असे सांगताना त्यांनी मनातील अनामिक भीती काढून टाकण्याचे आवाहन केले. अपयश आल्यास त्याचा विचार करून त्यावर मात करायला शिका. यशातील सातत्य टिकवा असे सांगताना त्यांनी रशियन खेळाडू सर्जी बुबका याचे उदाहरण दिले. स्वत:चा विक्रम त्याने २८वीस वेळा मोडून २९व्या वेळी जागतिक उच्चांक निर्माण केला. भविष्यकाळ घडवायचा असेल तर वर्तमान काळात कष्ट करा आणि जीवनातील सर्व अडचणींना सामोरे जा असा सल्ला दिला. आज माझ्या समोर बसलेले विद्यार्थीच उद्या या व्यासपीठावर बसतील अशी आपल्या जीवनात आलेली अनुभूती सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरता विद्यमानवर्षी घेण्यात आलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षा २०१६-१७ मधील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ रविवार दि. ५ मार्च २०१७ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झाला. या गुणगौरव समारंभाकरीता व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीचे पोलीस अपर अधिक्षक श्री. मितेश घट्टे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर; नियामक मंडळाचे श्री. जयंतराव करमरकर आणि श्री. उल्हास लांजेकर; कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे समन्वयक प्रा. डी. आर. वालावलकर, प्रा. दिलीप शिंगाडे, प्रा. महेश नाईक आदि मान्यवर उपस्थित होते.

कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या सन २०१६-१७ करिता प्रज्ञावान विद्यार्थी म्हणून अथर्व चंद्रशेखर तायशेटे (जीजीपीएस, रत्नागिरी); प्रज्ञावान विद्यार्थिनी म्हणून भाग्यश्री विजय यादव (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण) आणि मागासवर्गीय प्रज्ञावान विद्यार्थीनी म्हणून श्रेया शिरीष भालेकर (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी-चिंचघरी) हे विद्यार्थी पारितोषिकाचे मानकरी ठरले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दिलीप शिंगाडे याने केले. यानंतर प्रमुख पाहुणे श्री. मितेश घट्टे यांचा सत्कार श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि डॉ. सुखटणकर यांनी केला. यानंतर ‘उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार’ सौ. मीना नंदकुमार कोळपे, कै. सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय, साडवली-देवरुख, ता. संगमेश्वर यांना; ‘विशेष गौरव पुरस्कार’ श्री. नितीन बळीराम पाटील, को. एस. ओ. केशवजी विरजी कन्या विद्यालय, मु. ता. पनवेल, जि. रायगड यांना तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. विवेक भिडे (भौतिकशास्त्र विभाग) आणि प्रा. अनुजा घारपुरे (संगणकशास्त्र विभाग प्रमुख) यांना उत्कृष्ट शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार आणि श्री. अनिल सुवरे यांना उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू प्रदान करून गौरविण्यात आले.

त्यानंतर बोलताना प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी कोकण प्रज्ञा शोध परीक्षेतील गेल्या वीस वर्षांतील विविध पातळ्यांवर होत गेलेल्या अनेक बदलांचा आढावा घेतला आणि एकवीसाव्या वर्षी या परीक्षेची जागा आधुनिक माहिती तंत्रज्ञाने कशी घेतली आहे हे विषद केले. तसेच कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालायांतील शैक्षणिक उपक्रमांचा सातत्याने चढता आलेख उपस्थितांसमोर ठेवला; आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालायात सुरु असणारे पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक उपक्रम कसे विद्यार्थीभिमुख आहेत ते सांगितले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या उपयुक्ततेची आणि कोकणातील विस्तारासाठी कै. अरुअप्पा जोशी यांनी किती परिश्रम घेतले याची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांनी मला काय हवंय, मी काय करू शकतो आणि मला कोणते प्रयत्न करायला हवेत यांची विचारपूर्वक मांडणी केली तर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही याची गोष्ट सांगितली. सकारात्मक दृष्टीकोन, समभाव दृष्टी, जिद्द आणि आत्मविश्वास तुम्हाला जीवनात यशस्वी बनवेल असे विद्यार्थांना आवाहन केले. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या विस्ताराकरिता आपण अधिक महत्व देवू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

‘उत्कृष्ट ताकुका समन्वयक पुरस्कार’प्रदान करून गौरविण्यात आलेल्या सौ. मीना कोळपे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचा आपण सर्व तालुका समन्वयक मिळून तीनही जिल्ह्यात नक्कीच विस्तार करू असे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. आर. वालावलकर यांनी, बक्षीस वितरण समारंभाचे निवेदन प्रा. महेश नाईक यांनी तर अभारप्रदर्शन डॉ. मयूर देसाई यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला प्रज्ञावान विद्यार्थी, त्यांचे पालक, तीन जिल्ह्यांचे कोकण प्रज्ञा शोध परीक्षा तालुका समन्वयक, शहरातील नागरिक, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

कोकण प्रज्ञा शोध परीक्षा अंतिम निवड परीक्षेनिमित्त सकाळच्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांकरता ‘पालक सभेचे’ आयोजन करण्यात आले होते. या सभेत पालकांना रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी श्री. उत्तम सुर्वे यांनी मार्गदर्शन केले. गुणवान विद्यार्थी आणि पालक यांच्याविषयी त्यांनी भाष्य केले. आपल्या मार्गदर्शनानंतर त्यांनी पालकांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

Comments are closed.