ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तक पेढी योजनेमार्फत लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुस्तक संच वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, मागासवर्गीय सेलचे सदस्य डॉ. एस. डी. मधाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे प्रणेते आणि गणितज्ज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ग्रंथालयात कमवा व शिका योजनेत काम करणारी विद्यार्थिनी कु. आम्रपाली कांबळे हिने गुलाबपुष्प देऊन प्राचार्य आणि सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. त्यांनी भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक आणि नवी ग्रंथ वर्गीकरणपध्दती विकसित करणारे डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. तसेच महाविद्यालयीन ग्रंथालयाचा परिचय विद्यार्थ्यांना करून देताना ग्रंथालयात नव्याने सुरु झालेल्या विविध सुविधांचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. त्यानंतर पुस्तकपेढी योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांना मान. प्राचार्य आणि मान्यवरांच्या हस्ते वर्षभर अभ्यासण्यासाठी पुस्तक संचांचे वितरण करण्यात आले.
प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तक हे प्रमाण मानून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे, महाविद्यालयाचे ग्रंथालय विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध सुविधा देत आहे, या योजनांचा विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी फायदा करून घेतला पाहिजे असे सांगून महाविद्यालायाकरिता भरीव कार्य करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.