र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय समाज आणि विकास प्रक्रिया’ या विषयावरील ३१ व्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात सामाजिक विषयावरील आधारित विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. सदर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय किर्तीच्या समाजशास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉ. श्रुती तांबे, विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी गुलाबपुष्प देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. श्रुती तांबे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, ‘ग्रंथ हे उपयोगासाठी असून आपण ते अभ्यास आणि संशोधन कार्यासाठी सातत्याने उपयोगात आणले पाहिजेत. ज्ञान हे वाचल्याने अधिक प्रबळ होते त्यामुळे वाचन हे नियमित आणि निश्चयाने केले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला.’ ७५ वर्षे जुन्या या महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या ग्रंथ प्रदर्शनातील काही ग्रंथ आपल्याला आवडले असा अभिप्राय त्यांनी दिला आणि आयोजकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
याप्रसंगी डॉ. परमजीतसिंग जज, माजी अध्यक्ष, भारतीय समाजशास्त्र परिषद, नवी दिल्ली; डॉ. प्रदीप आगलावे, सदस्य सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई; डॉ. बालाजी केंद्रे, विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई; प्रा. नारायण कांबळे, अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषद; रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी मान्यवर तसेच प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.