गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर साहित्यविषयक ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला मान्यवर उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठ सिनेट मेंबर व म्हात्रे डिग्री कॉलेज, भिवंडीचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब साळवे लाभले होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी, ‘डॉ. आंबेडकर यांचेप्रमाणे केवळ आपल्या शिक्षणावर संपूर्ण लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी बहुश्रुत व्हावे जेणेकरून आपले विचार समृद्ध होतील; नंतर आपण आपल्या उदरनिर्वाहाकरिता प्रयत्न करावेत. शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च ठिकाणी जाऊन आपण मार्गदर्शन करावे.’ असे सांगितले. विद्यार्थी जीवनात डॉ. आंबेडकर हे सर्वप्रथम ग्रंथालयात असायचे व सर्वात शेवटी ग्रंथालयातून जाणारेही तेच असायचे, अशा काही त्यांच्या परदेशातील विद्यार्थी जीवनातील आठवणीही याप्रसंगी त्यांनी विषद केल्या. ग्रंथप्रदर्शनाच्या उपक्रमाला त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आणि विद्यार्थ्यांनी या समृद्ध ग्रंथालयाचा आपल्या अध्ययन कार्यात चांगला उपयोग करून घ्यावा अशी इच्छा व्यक्त केली.
याप्रसंगी वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, हिन्दी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, गणित विभागप्रमुख प्रा. डी. पी. करवंजे, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. शिवाजी उकरंडे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी तर आभारप्रदर्शन सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले.