गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना अभ्यास आणि संशोधन कार्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ‘निंबस’ या सॉफ्टवेअर प्राणालीच्या माहिती संदर्भातील सादरीकरण महाविद्यालयाच्या कै. डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे नुकतेच संपन्न झाले. सदर सादरीकरण ‘निंबस’ सॉफ्टवेअरचे प्रतिनिधी श्री. गिरीश कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करून विद्यापीठ स्तरावर हे सॉफ्टवेअर कार्यरत असून महाविद्यालयासाठी ते उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर या सॉफ्टवेअरची सविस्तर माहिती श्री. कुलकर्णी यांनी पॉवर पॉइंटच्या माध्यमातून दिली. या संगणक प्रणालीच्या माध्यमातून अनेक नामवंत प्रकाशकांची प्रकाशने, क्रमिक पुस्तके, नियतकालिके उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांना विविध प्रसंगी देण्यात येणाऱ्या सूचना तसेच शैक्षणिक युट्यूब व्हिडीओ, इतर उपयुक्त माहिती अशाप्रकारच्या अनेक सुविधा या सॉफ्टवेअरद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या संगणक प्रणाली उपयुक्ततेच्या दृष्टीने महाविद्यालयाला गरजेच्या असून महाविद्यालयाच्या आगामी स्वायत्ततेच्या वाटचालीत त्या अधिकच उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, आय.क्यू.एस.सी.चे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. विवेक भिडे, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे तसेच महाविद्यालयाच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख आवर्जून उपस्थित होते. आभारप्रदर्शन ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी तर तांत्रिक सहाय्य गणित विभागातील प्रा. प्रतिक शितुत यांनी केले.