केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आजादी का अमृत महोत्सव ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम’अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुष्ठरोग निवारण पंधरवडा रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत छात्रांसाठी कुष्ठरोग निर्मुलन अभियानांतर्गत श्री. विजय फोकांडे, जिल्हा पर्यवेक्षक यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी होते. याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी कुष्ठरोगाच्या लक्षणांची माहिती करून घ्या व आपल्या गावात तसेच आजूबाजूच्या समाजाला सांगा, समाजातील नवीन कुष्ठरुग्णांना शोधण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात शोधमोहिम सुरु आहे त्यामध्ये सामील व्हा, छात्रांच्या या प्रयत्नांमुळे व मोहिमेतील सहभागामुळे समाजात या आजाराविषयी शास्त्रीय माहिती पोहोचविण्यास मदत होईल असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. विजय फोकांडे यांनी कुष्ठरोग या आजाराचा इतिहास, लक्षणे, प्रकार, प्रतिबंधात्मक उपाय यावर सविस्तर माहिती छात्रांना दिली. कुष्ठरोग हा एक किरकोळ आजार असून तो मायक्रोबेक्टेरियल लेप्री या जिवाणूमुळे होतो. लवकर निदान आणि बहुविध औषधपद्धतीद्वारे पूर्णपणे बारा होतो असे सांगून राष्ट्रीय छात्र सेनेतील सहभागी छात्रांना मार्गदर्शन करत शासनाच्या या मोहिमेत सहभागी होण्यासाठी शपथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक लेफ्ट. अरुण यादव, तांत्रिक सहाय्य लेफ्ट. डॉ. स्वामिनाथन भट्टार तर आभारप्रदर्शन सिनियर कॅडेट कॅप्टन अभिषेक कदम याने केले. या कार्यक्रमाला कॅप्टन डॉ. सीमा कदम, लेफ्ट. दिलीप सरदेसाई आणि मेडिकल सहाय्यक श्री. संतोष गुटे उपस्थित होते.






Visitors Online : 0