gogate-college-autonomous-updated-logo

समाज ऋण फेडण्याचे राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ – डॉ. तुलशीदास रोकडे

gjc-nss-foundation-day-news-sep-2022

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थांना विविध प्रकारचे ज्ञान, कौशल्य प्राप्ती व समाजपूरक व्यक्तिमत्वाची जडण घडण होणे आवश्यक असते. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत असतो. दि. २४ सप्टेंबर १९६९ मध्ये भारतात शैक्षणिक विभागात सुरु झालेल्या या उपक्रमातून राष्ट्रभक्ती, जनसेवा, स्वयं शिस्त, अशा राष्ट्र व समाजभिमुख उपक्रमांना सुरुवात झाली. दि. २४ सप्टेंबर या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्थापना दिनी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या गीताने करण्यात आली, स्वामी विवेकानंदांची प्रतिमा पूजन व निसर्ग संवर्धनाची जबाबदारीचे प्रतिक म्हणून रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. विद्यावाचस्पती पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ. रोकडे यांचा प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. तुळशीदास रोकडे यांनी मातृपितृ ऋण, निसर्ग ऋण व समाज ऋण यांची माहिती देताना समाज ऋण फेडण्यास राष्ट्रीय सेवा योजना उत्तम व्यासपीठ कसे ठरू शकते हे सांगितले. आजच्या काळात आवश्यक असणारे व्यक्तिमत्व हे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्राप्त करता येईल. ज्ञान प्राप्तीच्या विविध संधी देखील या माध्यमातून उपलब्ध होतील, स्वयंसेवकांनी या व्यासपीठाचा वापर करून स्वगुणांना अधिक विकसित केले पाहिजे. समाजाप्रती असणारी आपली जबाबदारीच आपणास काम करण्याची प्रेरणा देते यासाठीच राष्ट्रीय सेवा योजना योजना विद्यार्थांना उपयुक्त ठरते असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागातून विद्यार्थांना मिळणाऱ्या विविध विद्यापीठ स्तरीय, राज्य व राष्ट्रीय संधी या विषयी माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा महाविद्यालयाचा वारसा मोठा असून या विभागाशी संबंधित अनेक विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी असून सामाजिक दायीत्वाची जबाबदारी आजही घेत आहेत. सध्याच्या मिडिया आणि मोबाइलच्या अतिरेकाच्या काळात विद्यार्थांनी स्व चिंतन करणे आवश्यक आहे, आपली अचूक ध्येय निश्चिती करून विद्यार्थांनी कार्य प्रवण राहावे व राष्ट्रीय सेवा योजना अधिक जाणून घेऊन आदर्श नागरिक, आदर्श विद्यार्थी व आदर्श कुटुंब सदस्य बनावे यासाठी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्थापना दिनाच्या या कार्यक्रमात प्रास्ताविक डॉ. दानिश गनी यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कु. नुपूर लाड हिने केले. कार्यक्रमास कार्यक्रमाधिकारी प्रा. उमा जोशी, प्रा. सचिन सनगरे तसेच विभागातील बहुसंख्य स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments are closed.