समाजप्रधानता विचारात घेऊन कार्य करण्याची गरज’ – प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी
महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थी दशेत सर्वाधिक संधी देणारा अभ्यासेतर उपक्रम म्हणून राष्ट्रीय योजना विभागाकडे पहिले जाते. अष्टोप्रहर कार्यरत विभाग असल्याने या विभागाचे व स्वयंसेवकांचे कार्य महत्वाचे ठरते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय योजना विभागाचे विद्यमान वर्षीचे औपचारिक उद्घाटन दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात स्वयंसेवकांना मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांनी समाजप्रधानता विचारात घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
सद्य परिस्थितीत युवकांच्या शक्तीचा वापर सुयोग्य कार्यासाठी होणे गरजेचे आहे आणि राष्ट्रीय सेवा योजना हे युवा शक्तीसाठी उत्तम व्यासपीठ आहे. राष्ट्र विकासाचे ध्येय पूर्तीसाठी या विभागात विपुल संधी आहेत. पर्यावरण, विज्ञान, ग्रामीण विकास, स्व-नेतृत्व विकास सोबत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांचे योगदान महत्वपूर्ण ठरते. राष्ट्राच्या विकासासाठी विद्यार्थांच्या क्षमतांचा विकास आणि उपयोजन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, पर्यावरण रक्षणाची जबाबदारीचे प्रतिक म्हणून रोपट्यास जल अर्पण करण्यात आले, पथनाट्य उपक्रमातील विद्यार्थांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्य क्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. लेनिता सनगरे हिने केले. सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा समन्वयक डॉ. राहुल मराठे, कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. सोनाली कदम, प्रा. शिवाजी उकरंडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी, प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा. हर्षदा पटवर्धन, विद्यार्थी प्रतीनिधी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.